करोना काळात लागू करण्यात आलेली टाळेबंदी, विविध निर्बंध यांमुळे सामान्यांचे जननजीवन विस्कळीत झाले होते. तसेच घरगुती आणि सांस्कृतिक, शासकीय सर्वच कार्यक्रमांवर देखील अनेक निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे करोनाकलावधीत अनेकांनी विवाह नोंदणीला पसंती दिली असल्याचे आकडेवारीतून समोर आले होते. मागील वर्षभरापासून करोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे. असे असले तरी गेल्या वर्षभराची विवाह नोंदणीची आकडेवारी पाहता अनेक जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती दिली आहे. मागील वर्षी ४ हजार ४९१ विवाह नोंदणी झाल्या आहेत तर २०२१ मध्ये देखील चार हजाराच्या घरातच नोंदणी झाल्या होत्या.
हेही वाचा- ठाणे : बंदूकीच्या गोळीच्या पुंगळीमुळे सापडले हत्येचा प्रयत्न करणारे गुन्हेगार
या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले होते. आता मात्र सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. तरीदेखील २०२० च्या तुलनेत २०२१ आणि २०२२ मध्ये नोंदणीद्वारे विवाहाला जोडपी प्राधान्य देत असल्याचे ठाणे जिल्हा विवाह कार्यालयाकडून सांगण्यात आले.
करोना काळात प्रशासनाने ५० ते २०० लोकांची मर्यादा दिल्याने अनेक जोडप्यांनी घरी किंवा नोंदणीद्वारे विवाहाला अधिक पसंती दिली होती. आता मात्र, निर्बंध हटविल्याने नोंदणीद्वारे विवाह करण्याकडे जोडप्यांचा कल असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये २ हजार ९६९ जोडपी नोंदणीपद्धतीने विवाहबंधनात अडकले. २०२१ मध्ये मात्र २०२० च्या तुलनेत चांगलीच वाढ दिसून येते, २०२१ मध्ये ४ हजार ५७४ आणि २०२२ मध्ये ४ हजार ४९१ जोडपी नोंदणीपद्धतीने विवाहबंध झाली.
करोना काळात टाळेबंदीमुळे सर्व जगच ठप्प होते त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाहाचे प्रमाण वाढले होते परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहे असे वाटत असताना २०२१ आणि २०२२ मध्ये देखील तितक्याच जास्त संख्येने नोंदणीपद्धतीने विवाह जोडप्यांनी केले. अशी माहिती एच.ए. कांदळकर प्रभारी, ठाणे जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी यांनी दिली.
हेही वाचा- ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायतसमिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर
वर्ष आणि नोंदणी विवाहांची संख्या (ठाणे शहर, जिल्हा)
वर्ष नोंदणी विवाहांची संख्या
२०२० २ हजार ९६९
२०२१ ४ हजार ५७४
२०२२ ४ हजार ४९१