बदलापूर: अहमदनगर तसेच माळशेळमार्गे ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल भागात येजा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अंबरनाथ-बदलापूर ते थेट बारवी धरणापर्यंतचा २७ किलोमीटरचा महत्वाचा रस्ता लवकरच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या ताब्यात जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या रस्त्याचा बारवी धरणापर्यंतचा भाग प्राधिकरणाकडे तर त्यापुढील मुरबाडपर्यंतचा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या वेशीवर १९७२ मध्ये बारवी धरणाची उभारणी केली. त्यानंतर दोन वेळा या धरणाची उंची वाढवून पाणी क्षमता वाढवण्यात आली. धरणाच्या उभारणीमुळे अंबरनाथ ते बदलापूर आणि बदलापूर ते बारवी धरण तसेच पुढे मुरबाड फाट्यापर्यंत असलेला रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीच्या अखत्यारित आला. सुरुवातीला नागरीकरण कमी असल्याने येथून स्थानिक ग्रामस्थांची तुरळक वाहने आणि शासकीय अधिकाऱ्यांची वाहने येजा करत. गेल्या काही वर्षांत बदलापूर आणि परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने येथे लोकवस्ती वाढली. बदलापूरसह शेजारची गावेही विस्तारली गेली. येथेही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या रस्त्याचा वापर वाढला आहे. अलिकडच्या काळात अहमदनगर, पुणे, माळशेजमार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचा भारही या रस्त्यावर वाढू लागला आहे. वर्दळीचा कल्याण, उल्हासनगर मार्ग टाळत या रस्त्यावरुन प्रवास सोपा होता. असे असले तरी दरवर्षी या रस्त्यावर खड्डे पडून तो खराब होत आहे. एमआयडीसी प्रशासन या रस्त्याची सातत्याने डागडूजी करते. असे असले तरी बदलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वडवली येथील तलाव, वाली चौक एरंजाड चौक, राहटोली चौक आणि त्यापुढे बारावी धरणापर्यंत आणि तिथून मुरबाडच्या फाट्यापर्यंतचा रस्ता सातत्याने खराब होतो. त्यामुळे इतक्या महत्वाच्या रस्त्याचा वापरच पुरेशा प्रमाणात होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या.
हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात डेंग्यू – मलेरियाची साथ
एमआयडीसी संचालक मंडळाची मान्यता
या रस्त्याचा वापर कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गापर्यंत जाण्यासाठी केला जात असल्याने अलिकडच्या काळात येथील रहदारी सतत वाढू लागली आहे. या रस्त्याला गेल्या काही वर्षांत अनेक काँक्रिटचे जोड रस्ते उभारले गेले. मात्र हा रस्ता मजबूत किंवा काँक्रिटचा उभारण्यात एमआयडीसी प्रशासनाला कायमच अपयश आले. एमआयडीसी प्रशासनाने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीपोटी २०१५ ते २०२३ या आठ वर्षांत तब्बल ३५ कोटी ८७ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यानंतरही रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. अंबरनाथ तालुक्याचा ग्रामीण भाग आणि बदलापूर शहरातील एमएमआरडीएच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याची देखभाल दुरुस्ती आता एमएमआरडीए प्रशासनाने करावी अशी मागणी मध्यंतरी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत एमआयडीसी प्रशासनानेही हा रस्ता एमएमआरडीकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून संचालक मंडळाने नुकतीच त्यास मान्यता दिली आहे. एकूण २७ किलोमीटरच्या या रस्त्यापैकी १५ किलोमीटरचा बारावी धरणापर्यंतचा रस्ता एमएमआरडीएकडे आणि त्या पुढचा मुरबाड फाट्यापर्यंतचा १२ किलोमीटर लांबीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
अहमदनगर, माळशेज मार्गाने डोंबिवली, पनवेल, ठाणे, मुंब्रा, कळवा, अंबरनाथ आणि बदलापूर या भागात ये जा करण्यासाठी हा मार्ग उत्तम पर्याय आहे. वर्दळीचा कल्याण मार्ग, उल्हासनगर टाळत या मार्गाने प्रवास सोपा होतो. याच मार्गावर बदलापूर जवळ मुळगाव, बारवी धरण, जंगल, मुरबाड आणि आसपासची पर्यटन स्थळे याच रस्त्याने जोडली गेली आहेत. पर्यटकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. मुरबाड, अंबरनाथ, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानक गाठण्यासाठी हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाची व्यवस्था राखणे आवश्यक आहे.
माळशेजमार्गे डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये वाहतुकीसाठी हा २७ किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत असावा अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जात होती. या संपूर्ण पट्ट्यात वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहे. शिवाय या भागातील पर्यटन आणि गावागावांमधील प्रवाशांनाही बदलापूर, अंबरनाथ यासारख्या शहरांपर्यंत वेगाने प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा रस्ता एमएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – उदय सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र