ठाणे : ठाणे वाहतुक पोलिसांनी अतिउत्साहीपणा दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवसास्थानासमोरील सेवा रस्ता वाहतुकीसाठी सात दिवस बंद केला होता. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे वाहतुक बदल लागू करण्यात आले असले तरी त्याचा उल्लेख अधिसूचनेत नव्हता. याउलट  खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वाहतुकीसाठी बदल लागू केल्याचा उल्लेख करत पोलिसांनी त्यांच्यावर खापर फोडले होते. खासदार शिंदे यांनी सूचना केल्यानंतर पोलिसांनी बदल तात्काळ मागे घेतले. दरम्यान, याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असून यामुळे संबंधित अधिकारी अडचणीत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तर वाहतुक पोलिसांनी अतिउत्साहीपणा दाखवित सेवा रस्ता बंद केला होता. तशी अधिसूचना पोलिसांनी बुधवारी काढली होती. ७ नोव्हेंबर पर्यंत हे बदल लागू राहणार असल्याचे पोलिसांनी अधिसूचनेत म्हटले होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे वाहतुक बदल लागू करण्यात आले असले तरी त्याचा उल्लेख अधिसूचनेत नव्हता. उलट खासदार शिंदे यांच्या कुटुंबियांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता बंद असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे शिंदे यांच्यावर समाजमाध्यमातुन टिका होऊ लागली होती. विरोधकांनीही या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली होती. तत्पूर्वी खासदार शिंदे यांनी वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधला आणि ही अधिसूचना मागे घेण्याची सूचना केली. तसेच नागरकांना होणाऱ्या त्रासाबद्दल अतिउत्साही अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने बदल मागे घेत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. दरम्यान, ही अधिसूचना काढून नागरिकांना त्रास देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे पत्र खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या पत्रामुळे संबंधित अधिकारी अडचणीत आले असून त्यांचा अतिउत्साहीपणा त्यांना भोवणार असल्याची चर्चा शहरात आहे.

वाहतुक पोलिसांनी चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अधिसूचना पारित केली होती. परंतु खासदार श्रीकांत शिंदे यांनी संपर्क साधून जनतेला त्रास होईल अशी कोणतीही अधिसूचना काढू नये असे सूचित केले. यामुळे आम्ही अधिसूचना मागे घेतली आहे. – डाॅ. विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The road in front of chief minister eknath shinde house is closed due to police overzealousness amy