सरकारी जमीन खासगी असल्याचे दाखवून विक्री
भगवान मंडलिक, कल्याण</strong>
डोंबिवलीत गुरचरण जमिनीवरील १८ हजार ५२५ मीटरचा ‘टीडीआर’ एका जमीन मालकाने विकासकाला रग्गड किमतीने विकला आहे. या प्रकरणी महसूल विभागाने चौकशी करून गुरचरण जमिनीच्या सात बारा उतारावर खाडाखोड करून ‘टीडीआर’ घोटाळा झाला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. गुरचरण जमिनीवरचा टीडीआर’ विकता येत नाही. असे असताना पालिका अधिकाऱ्यांनी ‘टीडीआर’ विकण्याला मंजुरी दिली आहे.
हे प्रकरण पालिकेच्या नगररचना विभागाशी संबंधित असल्याने महसूल विभागाने या प्रकरणी पालिकेने स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. सरकारी भूखंड, आरक्षित भूखंडावरचे टीडीआर कब्जेदार जमीनमालकांनी विकासकांना रग्गड पैसे घेऊन विकले आहेत, अशी विश्वसनीय माहिती आहे. डोंबिवली पश्चिमेत गावदेवी हद्दीतील गुरचरण (सव्र्हे क्र. ३२) जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर खाडाखोड करून एका राजकीय नेत्याने तसेच त्याच्या नातेवाईकांनी जमीन मालकीची असल्याचे दाखवून बांधकाम विकास हस्तांतरण हक्क विकल्याची तक्रार माहिती कार्यकर्ते मकरंद माडखोलकर यांनी लोकायुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. लोकायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. उताऱ्यावर खाडाखोड करून पालिकेच्या पाच आरक्षित जागा मालकी हक्काच्या असल्याचे दाखवून त्या आरक्षणांचा ‘टीडीआर’ पालिकेत बनावट दस्तऐवज सादर करून मिळविल्याचे माडखोलकर यांनी शासन, पालिकेच्या निदर्शनास आणले होते. ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी या प्रकरणाची चौकशी केली. उताऱ्यावर खाडाखोड केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. उताऱ्यावर खाडाखोड असताना पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी महसूल विभागाशी संपर्क करून उताऱ्यावरील खाडाखोडीची शहानिशा केली नसल्याबद्दल चौकशी अहवालात नाराजी व्यक्त करण्यात आली. या जमिनीवरचा ‘टीडीआर’ कसा देण्यात आला याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक मारुती राठोड यांनी सांगितले.
गुरचरण जमीन प्रकरणाची चौकशी महसूल विभागाने करून खाडाखोड झालेल्या नोंदी पूर्ववत केल्या आहेत. या जमिनींवरील ‘टीडीआर’ देण्याची कार्यवाही पालिकेने केली आहे. त्यामुळे आता पुढील कार्यवाही पालिकेने करायची आहे.
-अमित सानप, तहसीलदार, कल्याण