काल रात्री माटूंगा रेल्वे स्थानकाजवळ दादरहून निघातलेल्या पुदुच्चेरी एक्सप्रेसला सीएसएमटीहून निघालेल्या गदग एक्सप्रेसने धडक दिल्याने पुदुच्चेरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले. यामुळे जलद मार्गावरील रेल्वेमार्गाचे नुकसान झाले. डबे बाजुला करत आणि रेल्वे ट्रॅक आणि इतर यंत्रणा पुर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून दुपारनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या अपघातामुळे माटुंगा भागातील रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या असल्याने लोकलचे वेळापत्रक तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक हे पुर्णपणे कोलमडलं आहे.

मुंबई ते मनमाड आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या एकुण ७ गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत. तर मुंबईकडे येणाऱ्या चार गाड्यांची सेवा ही ठाणे, नाशिक रोड, पनवेल, मनमाड या ठिकाणी संपवण्यात आली आहे. तर दोन गाड्यांचे वेळापत्रक हे बदलवण्यात आले आहे.

मुंबईकडे जाणारा माटुंगा भागातील जलद मार्ग हा सकाळी साडे आठच्या सुमारास लोकल वाहतुकीकरता सुरु करण्यात आला असला तरी या वेगात लोकलच्या वेगावर मर्यादा आहे. सकाळपासूनच मध्य रेल्वेचे लोकलचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडलेले बघायला मिळाले. यामुळे खास करुन ठाण्याच्या पुढे कल्याण-बदलापूर-टिटवाळा मार्गावरील रेल्वे स्थानकांवर लोकलने प्रवास करणाऱ्यांची तुफान गर्दी झालेली बघायला मिळाली. यामुळे लोकल पकडणे हे अवघड झाले होते, मोठ्या प्रमाणात दरवाजाबाहेर लटकून प्रवासी प्रवास करतांना बघायला मिळाले. ही गर्दी बघता ठाण्याच्या पुढे मुंबईला येतांना बस किंवा अन्य पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Story img Loader