पूर्वा साडविलकर

रक्तद्रव आणि रक्तदान करण्यासाठी आवाहन;  रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा

ठाणे : करोनाच्या पहिल्या लाटेत लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत नागरिक विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्यनगर आणि सावरकरनगर प्रभाग समितीतील काही तरुणांनी पुढाकार घेऊन ‘समाजरक्षक पोलीस मित्र’ म्हणून काम पाहिले होते. तसेच अनेक रुग्णांना रिक्षातून रुग्णालयात पोहचवण्यास मदत केली होती. तरुणांचा हा समूह दुसऱ्या लाटेतही सक्रिय झाला असून टाळेबंदीच्या नियमांचे पालन करावे तसेच रुग्णांना मदत व्हावी यासाठी ही मंडळी यंदाही पुढाकार घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या समूहातील सदस्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ठाणे शहरातील लोकमान्यनगर – सावरकरनगर, वागळे आणि वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात गेल्या वर्षी करोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत होती. या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत शहरात रुग्णवाहिकेचा तुटवडा भासू लागला होता. या भागात रुग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याने दोन व्यक्तींना जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार करोनाच्या पहिल्या लाटेत घडला होता. या पाश्र्वभूमीवर ‘समाजरक्षक पोलीस मित्र’ यांनी ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घेऊन प्रभागातील काही रिक्षाचालकांना एकत्रित करत रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून दिल्या. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ही परिस्थिती कोणत्याही रुग्णावर उद्भवू नये म्हणून या समाजरक्षक पोलीस मित्रांनी पुन्हा पुढाकार घेऊन रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. तसेच करोनाच्या या लाटेत रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळणे, प्लाझ्मा, रक्त, रेमडेसिविर इंजेक्शन हे मिळवण्यासाठी नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. रुग्णांना या गोष्टी त्वरित उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा समूह प्रयत्नशील आहे. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक फेसबुक खात्यावर तसेच व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर संपर्क क्रमांक पोस्ट केले असून रुग्णाला कोणतीही मदत लागल्यास संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या समूहांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेत ५०हून अधिक रुग्णांना सहाय्य केले आहे.

सध्या प्लाझ्मा आणि रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी हा समूह वागळे इस्टेट येथील लोकमान्य टिळक रक्तपेढीशी हा समूह संपर्कात असून यांच्या माध्यमातून ते रुग्णांना प्लाझ्मा आणि रक्त उपलब्ध करून देत आहेत.

नव्या समूहात २० ते २५ वयोगटांतील १०० तरुण

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीतही गर्दी टाळण्यासाठी लोकमान्यनगर – सावरकरनगर परिसरांतील काही तरुणांनी वर्तकनगर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली समाजरक्षक पोलीस मित्र म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ते नागरिकांमध्ये करोनाविषयक जनजागृती करत होते. या समूहात २० ते २५ वयोगटांतील १०० तरुण त्यावेळी कार्यरत होते. यंदा यामध्ये दहा ते वीस जणांची वाढ झाली आहे.

Story img Loader