सार्वजनिक बांधकाम खातेही अनभिज्ञ; सर्वच शासकीय यंत्रणांचे मौन
वसईकरांना पुराच्या संकटात लोटणारा राजावली खाडीतील बेकायदा पूल तोडण्यात आला असला, तरी तो कुणी बांधला हे सांगायला कुठलीच शासकीय यंत्रणा तयार नाही. दोन वर्षे पूल खाडीवर होता आणि सगळीच यंत्रणा मौन बाळगून होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने तर आमचा या पुलाशी संबंध नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे हा पूल कुणी बांधला आणि त्याला अभय देण्यामागची कारणे अजूनही गुलदस्त्यात आहेत.
नायगाव पूर्वेला असलेल्या राजावली खाडीचे पात्र ४० फूट रुंद आहे. नालासोपारा आणि विरार शहारातील छोटे नाले सोपारा खाडीमार्गे राजावली खाडीत येतात. या खाडीच्या पाण्यावर मीठ उत्पादन केले जाते. मात्र दोन वर्षांपूर्वी राजावली खाडीत भराव टाकून एक पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे खाडीचे पात्र बुजवून केवळ दहा फुटांचे झाले होते. खाडीपात्रात भरतीचे पाणी येणे बंद झाल्याने त्यावर चालणाऱ्या मीठ उत्पादनावर परिणाम होऊ लागले. त्यामुळे खाडीलगतची तिवरांची झाडेही नष्ट झाली आहेत. खाडीत भराव करून पूल उभारला जात असल्यापासून सातत्याने या पुलाच्या विरोधात तक्रारी करण्यात येत होत्या. मीठ विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, महापालिका, जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांकडे तक्रारी करण्यात येत होत्या. परंतु कुणी कारवाई केली नाही. हा पूल आमचा नाही, असे उत्तर देण्यात येत होते.
सार्वजनिक बांधकाम खात्यानेही या पुलाशी आमचा संबंध नाही, असे सांगत हात वर केले आहेत. ही जागा मीठ विभागाची आहे, त्यामुळे या पुलाचा आमच्या खात्याशी संबंध नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जगदाळे यांनी सांगितले.
हा पूल कुणाचा ते आजही कुणी अधिकृतरीत्या सांगायला तयार नाही. खाडीजवळच एका बडय़ा उद्योगसमूहाची जागा होती. त्या उद्योगसमूहाने आपली जागा काही कोटींना विकली असल्याची माहिती पुढे आली आहे. या जागेवर गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. हा पूल पालिकेतील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या संमतीनेच बांधण्यात आला आहे, असा आरोप शिवसेनेचे नवघर माणिकपूर उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी केला आहे. तत्कालीन तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मग त्यांनी खाडीतील भराव आणि या पुलावर का कारवाई केली नाही, असा सवाल त्यांनी केला. या पुलामुळे शहरात पूर आला. कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आणि ५ बळी गेले. त्यामुळे या पुलाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याचा नाही. तक्रारदाराने या पुलाबाबत मीठ विभागाकडे पत्रव्यवहार केलेला होता. ती जागा मीठ विभागाची आहे. आमचा त्या पुलाशी संबंध नाही.
– राजेंद्र जगदाळे,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
पूल आमचा नाही असे सगळे सांगतात, पण खाडीत बेकायदा पूल बांधत असल्याचे माहीत असूनही शासकीय यंत्रणा गप्प का राहिल्या आहेत. पूल बांधणारे, पुलाला संरक्षण देणारे सर्व याप्रकरणी दोषी असून त्यांच्यावर कारवाई करावी.
– मिलिंद चव्हाण, शिवसेना नेते