वयाच्या साठीनंतर किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून शाळेची पायरी चढणाऱ्या मुरबाड तालुक्यातील आजीबाईंच्या शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थीनींना नुकतेच बॉलिवुडच्या महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले होते. ज्ञान मिळवण्याचा निश्चय साठीनंतर पूर्ण करणाऱ्या या आजीबाईंची स्वाक्षरी अमिताभ बच्चन यांनी आपल्या डायरीत घेतली. गुलाबी ब्रिगेड अशी बिरुदावली बच्चन यांनी यावेळी या आजीबाईंना दिली.
उतरत्या वयात किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून मुरबाडच्या फांगणे गावात काही वर्षांपूर्वी ‘आजीबाईंची शाळा’ सुरू झाली होती. अंबरनाथच्या मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षक योगेंद्र बांगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फांगणे आणि आसपासच्या गावातील आजीबाईंना यात शिकवण्यास सुरूवात केली. साठीनंतर शाळेची पायरी चढणाऱ्या या आजीबाईंनी गेल्या काही वर्षात अक्षरे गिरवत या शाळेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख तयार केली. आयुष्याच्या ज्या वयात माणूस नव्या गोष्टीची आशा सोडतो त्या वयात शिक्षणाला सुरूवात करणाऱ्या या आजीबाईंनी नुकतेच बॉलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.
बुधवारी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले. लहानपणापासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या आजीबाईंनी उतारवयात ज्ञान किती आवश्यक आहे याची प्रचिती दिली, त्यांना नमन असे गौरवोद्गार यावेळी अमिताभ बच्चन यांनी काढले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच अमिताभ बच्चन हे आजीबाईंच्या मधोमध जाऊन बसले होते. यावेळी बच्चन यांनी २२ आजीबाईंशी मनसोक्त गप्पा मारल्या, अशी माहिती शिक्षण योगेंद्र बांगर यांनी दिली. बच्चन यांनी काही प्रश्नही आजीबाईंना विचारले. यावेळी कौसाबाई चिंधू केदार या आजीबाईंचे अमिताभ यांनी पाया पडून आशीर्वाद घेतले.
आयुष्यात पहिल्यांदाच हिंदीतून संवाद –
कांताबाई मोरे या आजीबाईंनी यावेळी बागबान चित्रपट पाहिल्याची आठवण सांगितली. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनाही आनंद वाटला. कांताबाई मोरे या आजींनी आयुष्यात पहिल्यांदाच हिंदीतून संवाद साधला. त्यासाठी त्या अनेक दिवसांपासून सराव करत होत्या. तर काही आजींनी ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ आणि ‘शेहनशाह’ या चित्रपटाचे काही संवादही पाठ केले होते. अमिताभ बच्चन यांनी यावेळी आजीबाईंच्या स्वाक्षरी आपल्या डायरीत घेतल्या. जग ज्यांच्या स्वाक्षरीसाठी धावत त्यांनी आजीबाईंच्या स्वाक्षरी घेणे हा गौरवाचा क्षण होता, तो अनेक आजींच्या चेहऱ्यातून पहायला मिळाला, अशा भावना योगेंद्र बांगर यांनी व्यक्त केल्या. यावेळी आजीबाईंनी पाटीवर नाव लिहून ते बच्चन यांना दाखवले. या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणानंतर जगभरातून आजीबाईंची शाळा उपक्रमाचे कौतुक होते आहे.