ठाकरे गटाचे ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाण्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शाखा बळकविण्याचे षड्यंत्र रचले जात असून शिंदे गटाला समज द्यावी अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शिंदे गट आणि पोलीस खाते जबाबदार असेल असे पत्र ठाकरे गटाने पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना भेटून दिले आहे. यावेळी खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. यापूर्वीही

ठाण्यात अनेक शाखांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे ठाण्यातील शिवसेना शाखांच्या वादातून गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पत्रात त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचा मिंधे गट म्हणून उल्लेख केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेना आता शहरातील शाखांवर दावा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी ठाकरे गटाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होती. त्यांनी एक पत्रक सिंग यांना दिले आहे. त्या पत्रामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ५६ वर्षामध्ये महाराष्ट्रात अनेक शिवसेना शाखा व कार्यालये सुरु आहेत.

हेही वाचा >>> सततच्या जलवाहिन्या फुटीमुळे डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक हैराण

त्यापैकी ठाण्यामध्ये ही गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहराच्या विविध भागामध्ये शाखा कार्यान्वयित आहेत, असे म्हटले आहे. त्यापैकी काही शाखांची मालकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर काही पक्ष कार्यालायची मालकी खाजगी मालमत्ता धारकांकडे असून सदर मालमत्तेचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. असे असताना सुद्धा शिंदे गटाकडून सातत्याने जोर जबरदस्तीने शाखा बळकावण्यात आलेल्या आहेत. पक्षाशी द्रोह करण्याऱ्या गटाच्या पात्र अपात्रतेचा व पक्ष चिन्हाचा निर्णयाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या जुन्या शाखा बळकावण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा पत्रकात केला आहे. तसेच समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शिंदे गटाला योग्य समज द्यावी. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शिंदे गटाची व पोलीस खात्याची राहील असे पत्रामध्ये म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The shinde group and the police responsible dispute between the thackeray shinde group over branch in thane ysh