ठाणे – धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाण्याच्या जडणघडणीत असणारे योगदान लक्षात घेऊन खरंतर तमाम ठाणेकरांची अपेक्षा होती की या सेंट्रल पार्कला दिघे साहेबांचे नाव दिले जाईल. पण, नमो सैनिकांनी त्यांच्या नेत्यांचे नाव दिले. नमो नमो करत शिंदे गट भाजपच्या वाटेवर चालण्याचे हे संकेत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी समाजमाध्यमातून केली आहे.
अलीकडेच शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी आम्ही आता नमो सैनिक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ठाण्यातील ग्रँड सेंट्रल पार्कला मुख्यमंत्र्यांनी नमोग्रँड सेंट्रल पार्क असे नाव दिले. धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाण्याच्या जडणघडणीत असणारे योगदान लक्षात घेऊन खरंतर तमाम ठाणेकरांची अपेक्षा होती की या सेंट्रल पार्कला आनंद दिघे यांचे नाव दिले जाईल. पण नमो सैनिकांनी त्यांच्या नेत्यांचे नाव दिले. त्यामुळे नमो नमो करत शिंदे गट भाजपच्या वाटेवर चालण्याचे हे संकेत आहेत, अशी टीका केदार दिघे यांनी केली आहे.
हेही वाचा – ठाण्यात बहुमजली वाहनतळाची उभारणी, एमआयडीसी उभारणार ५८९ क्षमतेचे वाहनतळ
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार शिंदे गटाकडे पूर्वीपासूनच नव्हते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन्ही नेते शिंदे गटाला फक्त बॅनरवरील फोटोसाठी हवे असतात. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा विचार हा कधीच भाजप धार्जिणा नव्हता. केवळ सत्ता आणि स्वतः केलेले गैरव्यवहार दडपण्यासाठीच शिंदे गटाने शिवसेनेशी गद्दारी केली. आता त्यांच्या कृतीतून शिवसेना विरोधी भूमिका वारंवार स्पष्ट होत असून आनंद दिघे यांचा विसर शिंदे गटाला पडत चालल्याचे दिसत आहे, अशी टीकाही केदार दिघे यांनी केली आहे.