ठाणे – शहरात दशक्रिया आणि इतर कार्यासाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या श्रीकौपिनेश्वर मंदिर ट्रस्टने या विधींच्या क्रियांसाठी दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हे विधी पार पाडणाऱ्या तुरळक रक्कम घेतली जात होती. मात्र, ती आता विधीच्या ठिकाणा नुतणीकरणाचे कारण सांगत हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया या विधी करणाऱ्या गुरुजींमध्ये उमटू लागल्या आहेत. या संदर्भात मंदिर ट्रस्ट सोबत संपर्क साधला असता, कोणतेही पदाधिकारी प्रतिक्रिया देण्यास पुढे आले नाही. तसेच हा निर्णय प्रक्रियेत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
ठाणे शहरातील श्रीकौपिनेश्वर मंदिरात दशक्रिया, बारावे आणि तेरावे हे क्रियाकर्म करण्यासाठी जागा आहे. याठिकाणी ठाणे शहरासह घोडबंदर, कळवा, मुंब्रा दिवा या शहरांसह मुंलुंड, भांडूप आणि घाटकोपर मधूनही नागरिक येतात. त्यामुळे या विधींसाठी हे महत्त्वाचे केंद्र आहे. पूर्वी या घाटावर पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या तसेच त्याचे बांधकाम देखील जुने होते.
परंतू, आता हे बांधकाम जुने झाल्यामुळे श्रीकौपिनेश्वर मंदिर ट्रस्टने अलिकडेच खर्च करुन क्रियाकर्माच्या जागेचे नूतनीकरण केले आहे. ही जागा सर्व सोयींनी सुसज्ज केली आहे. बसण्यासाठी पुरेपुर अशी आसन व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, छप्पर अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यासाठी मंदिर ट्रस्टला सर्वाधिक खर्च करावा लागला. त्यामुळे क्रियाकर्मासाठी ट्रस्ट ने काही नवीन नियम आखले आहेत. याचे परिपत्रक नुकतेच समोर आले आहे. त्यात, दर वाढीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
नूतनीकरण करण्यापूर्वी क्रियाकर्म करण्यासाठी येणार्या नागरिकांकडून २०० रुपये जागेचे भाडेदर आकारले जात होते. हे दर नागरिकांना परवडणारे होते. परंतू, आता हे दर थेट १००० करण्याचा निर्णय ट्रस्ट ने घेतला आहे. हा निर्णय क्रियाकर्म करणार्या गुरुजींना पटलेला नसून त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहियेत मंदिर ट्रस्ट क्रियाकर्म च्या नावाने व्यवसाय करू बघत असल्याचा आरोप काही गुरुजींनी केला आहे. दरम्यान, या संदर्भात मंदिर ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आले नाही.
अद्याप दर निश्चित नाही
दर वाढीचा केवळ निर्णय झाला आहे. अद्याप १००० रुपये इतक्या दरावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. या संदर्भात समिती सोबत परत एकदा बैठक होणार आहे त्यानंतर दर निश्चित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या दरवाढी संदर्भात आम्ही सर्व गुरुजींनी एकत्र येत अर्ज लिहिला आहे. जर दर वाढवायचे असतील तर ते १००० रुपये ऐवजी ४०० रुपये करावे अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे. इतर ठिकाणी क्रियाकर्म साठी व्यवस्थित सोयी सुविधा नसल्याने तसेच पैसे आकारले जात असल्यामुळे ठाणे शहरासह मुंबईतील नागरिक देखील श्रीकौपिनेश्वर मंदिरात येतात. त्यांच्यासाठी ही दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळे दरवाढी संदर्भात ट्रस्ट ने पुन्हा एकदा विचार करावा. – अनंत जोशी, गुरुजी