अभ्यासावरुन आई ओरडली म्हणून राग आलेल्या डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील एका १२ वर्षाच्या मुलाने बाहेरचे रस्ते, गल्ल्यांची माहिती नसताना ९० फुटी रस्त्याने थेट ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठले. मुलगा खासगी शिकवणी वर्गात गेला नाही. घरी पण वेळेत आला नाही म्हणून धास्तावलेल्या पालकांनी टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुलाला ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. गुरुवारी ही घटना घडली होती.
हेही वाचा >>> करोनात अनाथ झालेल्या मुलांचे शालेय शुल्क माफ करण्याचे खासगी शाळांना बालहक्क आयोगाचे आदेश
ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील एका मध्यवर्गीय सोसायटीत राहणारा एक १२ वर्षाचा मुलगा गुरुवारी सकाळीच अभ्यासा वरुन आई रागावली म्हणून घरात रुसून बसला. खासगी शिकवणीची वेळ आली तेव्हा मुलाने आपले दप्तर काखोटीला मारुन रागाच्या भरात सकाळी १० वाजता घर सोडले. तो शिकवणीला गेलाच नाही. तो नेहमीप्रमाणे शिकवणी झाली की घरी येईल या भ्रमात आई राहिली. मुलाची नेहमीची घरी यायची, शाळेची वेळ झाली तरी तो येत नाही म्हणून आईन शिकवणी वर्गात संपर्क केला. तिला मुलगा शिकवणीला आला नसल्याचे समजले. त्यानंतर मात्र घाबरलेल्या आईने मुलाच्या मित्रांना संपर्क करुन तो कोठे दिसला का. कोठे गेला म्हणून चौकशी केली. परंतु कोणी काही सांगू शकले नाही. आपण मुलाला सकाळी ओरडलो त्यामुळे तो रागाच्या भरात काही करतो की काय विचाराने मुलाची आई व्याकुळ झाली. परिसरात शोध घेऊनही मुलगा सापडत नसल्याने या मुलाच्या आईने थेट टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांना घडला प्रकार सांगितला. आफळे यांनी तात्काळ पोलिसांचे पथक तयार करुन मुलगा राहत असलेल्या घरापासून ते परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश दिले. पोलिसांची पथके परिसरातील सीसीटीव्ही पाहत असताना त्यांना दोन ते तीन चित्रीकरणात मुलगा ९० फुटी रस्त्याने ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे जात असल्याचे समजले.
हेही वाचा >>> डोंबिवलीत भरदुपारी महिलांकडून तीन लाखाची लूट
ठाकुर्ली परिसरात मुलाचा शोध पोलीस घेत असताना पोलिसांनी दुपारी अडीच वाजता ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठले. त्यांना सीसीटीव्ही मध्ये दिसणारा मुलगा बाकड्यावर बसल्याचे दिसले. पोलिसांनी थेट मुलाच्या अंगावर न जाता, प्रवासी म्हणून त्याच्या शेजारी जाऊन बसले. बाळा तू कोठुन आला आहेस. कुठे चालला आहे. तुझे रेल्वे तिकीट कुठे आहे असे बोलून मुलाचा विश्वास संपादन केला. यावेळी मुलाने आपल्या समजुतीने उत्तरे दिली. पोलिसांनी मुलाला गोडीगुलाबीने टिळकनगर पोलीस ठाण्यात आणले. त्याला पाणी पाजले. खाऊची विचारणा केली. पोलीस हे पोलीस काका आहेत हे समजल्यावर मुलाने मला सकाळी आई ओरडली म्हणून मी घर सोडून रागाने बाहेर पडलो, असे उत्तर वरिष्ठ निरीक्षक आफळे यांना दिले. मग, आफळे यांनी बाळा असे काही करायचे नसते. असे बोलून मुलाची समजुत काढली. त्याचा राग ओसरल्याचे दिसल्यावर पोलिसांनी मुलाच्या आईला संपर्क केला. भेदरलेली आई पोलीस ठाण्यात येताच तिने मुलाला पाहून घट्ट मिठीत घेऊन हंबरडा फोडला. यावेळी वातावरण भावुक झाले होते. मुलाला यापुढे असे काहीही न करण्याची समज पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांच्या तत्पर हालचालींमुळे मुलगा मिळाल्याने पालकांनी पोलिसांचे कौतुक केले.