ठाणे: ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील अंतर्गत भागासाठी आखलेली मेट्रो सहा डब्यांचीच असावी यासाठी राज्य सरकारने आग्रह धरला आहे. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावर दर दिवशी सात ते आठ लाख प्रवाशांचा भार असतो. ठाण्यातील अनेक भागात समूह विकास योजनेतून पुर्नविकासाचे नवे प्रारुप उभे रहात आहे. यामुळे भविष्यातील लोकसंख्या काही लाखांनी वाढणार आहे. त्यामुळे ही मेट्रो सहा डब्यांचीच असायला हवी असे आग्रही प्रतिपादन राज्य सरकारने केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे केले असून त्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणेकरांना वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल यासाठी ठाणे महापालिकेने अंतर्गत मेट्रो प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामेट्रोची (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) मदत घेण्यात आली आहे. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. यामध्ये वडाळा-घाटकोपर-कासारवडवली आणि ठाणे-कल्याण-भिवंडी या मेट्रो मार्गांचा समावेश आहे. ठाणे शहराचा झपाट्याने विस्तार होत असून शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. समूह विकास योजनेच्या माध्यमातून येत्या काळात एक नवे ठाणे उभे रहाणार असून त्यानंतर ही लोकसंख्या काही लाखांनी वाढणार आहे.

हेही वाचा… शिवमंदिर परिसराच्या सुशोभिकरणाला होणार सुरुवात; पुरातत्व खात्याच्या मंंजुरीनंतर १०७ कोटींचे कामाचे कार्यादेश

सद्यस्थितीत ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ आहे. हे लक्षात घेऊन मुख्य मार्गावरील मेट्रो प्रकल्पांसह ठाण्यातील अंतर्गत वाहतूकीसाठी २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारने यापुर्वीच केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. या प्रस्तावात सहा डब्यांची मेट्रो प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे शहरात सद्यस्थितीत असलेल्या प्रवाशी संख्येनुसार सहाऐवजी तीन डब्यांची मेट्रो करावी अशी सूचना केंद्र सरकारने ठाणे महापालिकेस केली आहे. या प्रकल्पासाठी १० हजार ४१२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत धरण्यात आला आहे. त्यापैकी जवळपास ५० टक्के इतका निधी केंद्राकडून मिळणार आहे. त्यामुळे केंद्राो केलेली तीन डब्ब्यांची सूचना ग्राह्य धरणे ठाणे महापालिकेस भाग पडू शकते.

मुख्यमंत्र्यांचा सहा डब्ब्यांसाठी आग्रह

मोठ्या शहरांमध्ये सहा डब्ब्यांची मेट्रो तीन मिनीटांच्या अंतराने चालविण्यात येते. ठाण्यातील तीन डब्ब्यांची मेट्रो दीड मिनीटांच्या अंतराने चालवावी अशी सूचना केंद्राने केली आहे. दरम्यान ठाणे शहराचा वाढता आवाका लक्षात घेता ही मेट्रो सहा डब्यांची हवी असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते. या भेटीत ठाणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प सहा डब्ब्यांचा असायला हवा अशी भूमीका मुख्यमंत्र्यांनी मांडली. ठाण्याचा विस्तार वाढत असून या शहराला लागूनच काही विकास केंद्र विकसीत होत आहे. त्यामुळे अंतर्गत मेट्रोचा वापर ठाणे बाहेरुन येणारे प्रवाशीही करु शकणार आहेत. त्यामुळे भविष्यात प्रवाशांची संख्या वाढणार हे लक्षात घेऊन डब्ब्यांची संख्या वाढविण्याशिवाय पर्याय नाही, हे या भेटीस केंद्रीय मंत्र्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

असा आहे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प

एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा राज्यातील सर्वच शहरांसाठ पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. राज्य सरकारमार्फत ठाणे आणि आसपासच्या भागात वेगवेगळी विकास केंद्र उभी केली जात आहेत. ठाणे शहरही रोजगार निर्मीतीचे मोठे केंद्र ठरु लागले आहे. याशिवाय पुर्नविकासाचे एक नवे प्रारुपही या शहराने अंगिकारले आहे. या परिस्थितीत अंतर्गत मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. मुख्य मार्गावरुन धावणाऱ्या मेट्रो प्रकल्पास अत्यंत पुरक ठरेल असा हा प्रकल्प असून तो सहा डब्ब्यांचाच असावा या राज्य सरकारच्या भूमीकेस केंद्रीय मंत्री पुरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state government has insisted that the thane metro should have six coaches dvr