डोंबिवली: मागील दोन दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील पथदिवे बंद राहत असल्याने प्रवाशांना अंधारातून रेल्वे स्थानकाकडे जावे लागते. पादचाऱ्यांना मोबाईल विजेरीचा वापर करून या भागातून येजा करावी लागते. अनेक महिला सकाळच्या वेळेत रेल्वे स्थानककडे येतात. त्यांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील डाॅ. राॅथ रस्ता, रामनगर वाहतूक विभाग कार्यालय परिसर सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या भागात रिक्षा स्थानक आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकात येणाऱ्या, जाणाऱ्या प्रवाशांची या रस्त्यावरून वर्दळ असते. भाजीपाला, मासळी आणण्यासाठी पहाटेच मुंबई, कल्याण भागात गेलेला व्यापारी सकळीच डोंंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात आला की त्याला अंधारात चाचपडत इच्छित स्थळी जावे लागते. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी मुंबई, ठाणे भागात सकाळीच रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. त्यांना या अंधारामुळे आपल्या पालकांना सोबत आणावे लागते.
हेही वाचा… ठाणे ग्रामीणचा मैला व्यवस्थापन प्रकल्प रखडला; प्रकल्पाचे काम देण्यात आलेली संस्थांच डबघाईला
कल्याण, डोंबिवलीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. अशा अंधाराचा गैरफायदा घेऊन त्यांचा याठिकाणी वावर वाढण्याची भीती प्रवासी व्यक्त करतात. अलीकडे दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लांंबविली जात आहे. काही पादचारी पालिकेच्या डोंबिवली कार्यालयात बंद पथदिव्यांची तक्रार घेऊन जात आहेत. तेथील कार्यालये इतर भागात स्थलांतरीत झाली आहेत. त्यामुळे तेथे त्यांना उत्तर मिळत नाही. अधिक माहितीसाठी विद्युत विभागाचे उपअभियंता जितेंद्र शिंदे यांना संपर्क साधला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.