गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बदलापूर शहरातील रिक्षा चालकांचा संप अखेर मिटला आहे. पश्चिमेतील बाजारपेठ परिसरात स्थानकाशेजारी रिक्षा थांबा हटवल्याने संतप्त रिक्षाचालकांना पालिका प्रशासनाविरूद्ध बेमुदत संप पुकारला होता. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सोमवारी स्थानकाशेजारीच पर्यायी जागा दिल्याने रिक्षाचालकांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बदलापुरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा >>>ठाणे: कार घेऊन दरोडा करण्यासाठी आलेल्यांचा प्रयत्न फसला
बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकजवळ होम फलाटाची उभारणी गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने फलाट पूर्णत्वास जात नाही. परिणामी होम फलाटाचे काम रखडले होते. त्यात गेल्या आठवड्यात होम फलाटाला लागून असलेल्या जागेत व्यापाऱ्यांनी ३५ गाळे अनधिकृतपणे उभे केले होते. त्यावर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर होम फलाटासाठी आवश्यक जागाही मोकळी करण्यात आली. यासाठी स्कायवॉकखालील जागेत असलेला रिक्षा थांबा तोडण्यात आला. त्यामुळे रिक्षाचालकांना संताप व्यक्त करत शुक्रवारी रात्रीपासून शहरात बेमुदत संपाची घोषणा केली. शनिवार, रविवार आणि सोमवार दुपारपर्यंत हा संप सुरू होता. प्रामुख्याने बदलापूर गाव, रमेशवाडी, सोनिवली आणि त्यापुढच्या भागातील प्रवाशांना त्याचा फटका बसला. त्यामुळे रिक्षा सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. सोबतच सोमवारी सकाळपासून संप पुकारणाऱ्या रिक्षा चालक मालक वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून नागरिकांच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. नागरिकांनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर दुपारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्यासोबत संप पुकारणाऱ्या रिक्षाचालकांची बैठक झाली. चर्चेअंती स्थानकाशेजारी स्कायवॉक संपतो तेथून पुढे एकरेषेत रिक्षा थांबवण्यास मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी परवानगी दिली. त्यामुळे रिक्षाचालकांनी आपण संप मागे घेत असल्याचे घोषीत केले. अखेर सायंकाळपासून बदलापूर शहरातील रिक्षा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हेही वाचा >>>चार महिन्यात १९५ कोटी मालमत्ता कर वसुलीचे आव्हान ;‘कडोंमपा’ची मागील आठ महिन्यात १८० कोटी वसुली
रिक्षाचालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक घेतली. त्यात त्यांना पर्यायी जागा दिली आहे. रेल्वेचे होम फलाटाचे काम संपल्यानंतर त्यांचा रिक्षाथांबा पू्र्ववत केला जाईल. – योगेश गोडसे, मु्ख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.