ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील टिएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशीरा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांच्या निव्वळ वेतनात साडे चार हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या या संपामुळे ठाणेकरांचे हाल झाले.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ४७४ बसगाड्या असून त्यापैकी ३९० बसगाड्या प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असतात. यातील २४० बसगाड्या कंत्राटी पद्धतीने चालविल्या जातात. मंगळवारी पहाटे या कंत्राटी पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या बसगाड्यांवरील चालकांनी वेतनाच्या मुद्द्यावरून संप सुरू केला होता. त्याचा परिणाम ठाणेकरांना सहन करावा लागला. दिवसभर टिएमटीच्या थांबे, सॅटीस पुलावर प्रवाशांची गर्दी झाली होती.दरम्यान, संपाच्या कालावधीत केवळ १७० बसगाड्या उपलब्ध होत्या. टिएमटीच्या अधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याची विनंती कर्मचाऱ्यांना केली. परंतु लिखीत स्वरूपात मागण्या मान्य केल्यास संप मागे घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी ठाम होते. अखेर रात्री टिएमटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यानंतर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास संप मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. कामगारांच्या वेतनामध्ये साडे चार हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे टिएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितले. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करत बुधवारी पहाटेपासून टिएमटी बसगाड्यांची वाहतुक सुरळीत होणार असल्याचेही ते म्हणाले.