कल्याण शिळफाटा रस्त्याने भरधाव वेगाने बस चालवित चालेल्या एका बस चालकाने बस समोरील दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकी बसच्या पुढील भागात अडकून दुचाकी स्वारांसह बस २५ मीटर पुढे नेऊन दुचाकी वरील मुलांना फरफटत नेले. सुदैवाने ते या अपघातात बचावले. यामध्ये एका मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी ही घटना घडली.

उमेश इंद्रजित यादव (१८, रा. पृथ्वीछाया इमारत, सोनारपाडा, शंकरानगर, डोंबिवली पूर्व) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. उमेश आपल्या मित्राच्या दुचाकी वरुन पाठीमागे बसून महाविद्यालयात चालला होता. ते शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारा समोरुन चालले होते. यावेळी दुचाकीच्या पाठीमागून भरधाव वेगाने आणि वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून एक बस चालक वेगाने बस चालवित होता. या बसला पुढे जाण्यासाठी मार्गिका करुन देऊनही भरधाव वेगात असलेल्या बस चालकाने उमेश बसलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली.

हेही वाचा : डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्दुल्ल्यांचा प्रवाशांना उपद्रव

या धडकेत दुचाकी बसच्या एका कोपऱ्यावर अडकून दुचाकीसह त्यावरील दोघांना २५ मीटर फरफटत नेले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेले पादचारी, इतर वाहन चालकांनी ओरडा केल्यानंतर पुढे जाऊन बस चालकाने बस थांबवली. अन्यथा मोठी दुर्घटना या भागात घडली असती.
उमेशने तातडीने बाजुलाच असलेल्या मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बस चालका विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

Story img Loader