गेल्या काही दिवसांपासून उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभरात हुडहुडी भरलेली असताना ठाणे जिल्ह्यातही तापमानात घट दिसून आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात चांगला गारठा जाणवत असून जिल्ह्याचे सरासरी तापमान १२ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. जिल्ह्यात बदलापूर आणि आसपासच्या भागातील तापमान १० अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसात हा गारवा कायम राहणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.
हेही वाचा- महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची गुरुवारी डोंबिवलीत बैठक
राज्यभरात विविध जिल्ह्यात तापमानात घट नोंदवली गेली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमध्येही गेल्या काही दिवसांपासून पारा घसरल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यातही तापमानात मोठ्या प्रमाणावर घट नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात हुडहुडी जाणवते आहे. जिल्ह्याचे सरासरी तापमान १० ते १२ अंश सेल्सियसमध्ये राहत असल्याचे दिसून आले आहे. शनिवार आणि रविवार कडाक्याच्या थंडीत गेल्यानंतर सोमवारीही जिल्ह्यात थंडीचा अनुभव आला. जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद बदलापूर शहरात झाली. सोमवारी बदलापूर शहरात १०.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शहरात हुडहुडी जाणवत होती. तर आसपासच्या मुरबाड, अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्येही अशाच प्रकारचे तापमान जाणवल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. शेजारच्या कर्जत शहरात ११ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. उत्तरेत पारा उतरल्याने कोकण आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यात तापमानात घट जाणवत असल्याचेही मोडक यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- ठाण्यातील गावदेवी भुमीगत वाहनतळाचे लोकार्पण आचारसंहितेमुळे लांबणीवर
आणखी दोन दिवस थंडी कायम
उत्तरेतल्या थंडीमुळे इथेही जाणवणारा थंडीचा प्रभाव आणखी दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर तापमानात किंचीत वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर तापमान सरासरी १४ ते १५ अंश सेल्सियसवर राहण्याचा अंदाज असल्याचे अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- रस्ते कामांमुळे ठाणे कोंडण्याची शक्यता?, मे महिना अखेरपर्यंत सर्वच कामे उरकरण्याचे पालिकेचे उद्दीष्ट
शहर – तापमान
बदलापूर – १०.७
कल्याण – १२.९
डोंबिवली – १३.५
पनवेल – १३.५
ठाणे – १४.७
नवी मुंबई – १४.७