ठाणे: यंदाच्या दिवाळीत ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून देण्यात यावा, अशी मागणी ठाणे म्युनिसिपल लेबर युनियनने पालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यावर पालिका प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नसून पालिका आणि कामगार संघटना यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर सुमारे सात हजार अधिकारी-कर्मचारी आहेत. तर अडीच हजारांच्या आसपास कंत्राटी कर्मचारी आहेत. आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी पालिकेकडून सानुग्रह अनुदान देण्यात येते. गेल्यावर्षी अधिकारी-कर्मचाऱ्यांना १८ हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेने हे सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून देण्यात आला होता.
हेही वाचा… ठाणे: १४४ उद्यानांचा नव्या आराखड्यात समावेश; नवीन झळाळी देण्याबरोबरच निगा, देखभालीकडे विशेष लक्ष
कंत्राटी कामगारांना १८ हजार ते २० हजार इतके मासिक वेतन मिळते. यंदाही ठाणे म्युनिसिपल लेबर युनियनने पालिका प्रशासनाला पत्र देऊन अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे तर, कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन बोनस म्हणून देण्यात यावा, अशी मागणी युनियनने केली आहे. या संदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती.
परंतु सानुग्रह अनुदान देण्याबाबत पालिका प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे दिवाळी सण आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना पालिका कर्मचारी सानुग्रह अनुदानाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात युनियनचे पदाधिकारी चेतन आंबोणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. सानुग्रह अनुदानासंदर्भात आयुक्त बांगर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ते स्वत: याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे ते लवकरच निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करतील, असे त्यांनी सांगितले.