ठाणे : एका बंद बंगल्यामध्ये घरफोडी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न गावकऱ्यांमुळे फसला. चोरी करण्यासाठी जीपमधून आलेल्या या टोळीला स्थानिक नागरिकांनी मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चोरट्यांना मारहाण झाल्याने मारहाण करणाऱ्यांविरोधातही भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडी वाडा रोड येथील कवाड गावामध्ये एका व्यवसायिकाचे बंद घर आहे. या घरामध्ये व्यवसायिकाचे मौल्यवान वस्तू ठेवल्या आहेत. रविवारी मध्यरात्री पाच चोरट्यांनी या घरामध्ये घरफोडी करण्याचे ठरविले होते. ते चोरटे एका जीपगाडीने तेथे पोहचले. चोरट्यांमध्ये एका महिलेचा देखील सामावेश होता. ही महिला घराबाहेर उभ्या असलेल्या जीपमध्ये थांबून कोणी येते का याकडे लक्ष ठेवत होती. तर इतर चोरटे कटावणीच्या साहाय्याने दरवाजाची कडी तोडून घरामध्ये शिरले. त्यांच्या हातामध्ये लोखंडी राॅड देखील होते. त्यांनी कपाटे उघडून घरातील साहित्य चोरण्यास सुरूवात केली. त्याचवेळी त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना घरात चोर शिरल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत घर मालकाला माहिती दिली. त्यानंतर स्थानिक रहिवासी घराबाहेर जमले. त्यांनी घरामध्ये पाहिले असता, तेथे चोर आढळून आले. यानंतर चोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घराबाहेर उभे असलेल्या काही नागरिकांनी पाच पैकी चार चोरट्यांना पकडले. त्यांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अंधाराचा गैरफायदा घेऊन एक चोरटा तेथून पळून गेला. घटनेनंतर चोरट्यांना भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर मारहाण केल्याने चोरट्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मारहाण करणाऱ्या जमावाविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader