महाराष्ट्राच्या विविध भागात दिवसा, रात्री चोऱ्या करुन गायब होणाऱ्या कल्याण जवळील आंबिवली गावत राहत असलेल्या एका खतरनाक चोरट्याला पकडण्यात भिवंडी पोलीस ठाणे हद्दीतील कोनगाव पोलीसांना सोमवारी यश आले. राज्याच्या विविध भागातील पोलीस ठाण्यांमधील पोलीस या चोरट्याच्या मागावर होते.
या चोरट्याच्या अटकेने डोंबिवली, कल्याणसह राज्याच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोऱ्या उघड करणे पोलिसांना शक्य होणार आहे. बाकर उर्फ बाबर आक्रम अल्ली (३९, रा. पाटीलनगर, शेरा हिच्या घराच्या पाठीमागे, आंबिवली, कल्याण. मूळ गाव- मोहन मार्केट, बिदर, इरागल्ली, ता. बिदर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक आरोपीचे नाव आहे.गुन्हे शाधोचे उत्तम जाण असलेल्या पोलीस उपायुक्त म्हणून नवनाथ ढवळे यांनी भिवंडी परिमंडळाचा पदभार स्वीकारताच त्यांनी भिवंडी शहर परिसरातील घडलेल्या गु्न्ह्यांचा तत्परतेने तपास करुन आरोपींना पकडण्याचे आदेश दिले आहेत. या पाठपुराव्यातून बाकरला पकडण्यात कोनगाव पोलिसांना यश आले.
हेही वाचा >>>पोलिस नसलेले व्यक्तीही करीत होते आमच्यावर लाठीहल्ला; नरेश म्हस्के यांचा गंभीर आरोप
कोनगाव पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात राहणाऱ्या रोहिणी विजय राणे (५५) आणि त्यांची सून भिवंडी बाह्यवळण रस्त्याने एका रिक्षेतून कल्याण दिशेकडे संध्याकाळच्या वेळेत येत होत्या. भिवंडी-कल्याण रस्त्यावरील रांजणोली गाव येथे प्रवीण लाॅज जवळ रिक्षा चालकाने पाण्याची बाटली घेण्यासाठी रिक्षा रस्त्याच्या बाजुला उभी करुन तो बाटली खरेदीसाठी दुकानात गेला. तेवढ्यात दुचाकीवरुन दोन जण वेगाने रिक्षेच्या दिशेने आले आणि त्यामधील पाठीमागे बसलेल्या एकाने रिक्षेत बसलेल्या रोहिणी यांच्या मानेवर जोराने झडप मारुन त्यांचे मंगळसूत्र हिसकले. रोहिणी यांनी मंगळसूत्र पकडून ठेवले. पण चोरट्याने ते जोराने हिसका देऊन लुटून नेले. मंगळसुत्राचा अर्धा भाग रोहिणी यांच्या जवळ राहिला. क्षणात घडलेल्या या प्रकराने सासु सुना घाबरल्या. त्यांनी घडला प्रकार रिक्षा चालकाल सांगितला. कोनगाव पोलीस ठाण्यात रोहिणी यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेल्याने रोहिणी यांनी हळहळ व्यक्त केली.
हेही वाचा >>>“तर ती महिला माझ्या अंगावर पडली असती, अन्…,” जामीन मिळताच आव्हाडांचा गंभीर आरोप, म्हणाले “सगळं ठरलं होतं”
पोलिसांनी रांजणोली गाव परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी दुचाकीवरुन दोन जण रिक्षेच्या दिशेने येऊन झडप घालून पळून गेल्याचे दिसत होते. पोलिसांनी वाहन क्रमांक आणि त्या आधारे आरोपीची ओळख पटविली. अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेला बाकर यानेच ही लुट केली असल्याचा पोलिसांनी अंदाज बांधला. त्या दिशेने तपास सुरू केला. बाकर आंबिवली मध्ये राहतो. त्याच्या घरावर पाळत ठेवली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर कल्याण परिसरात झडप घालून त्याला अटक केली. त्याच्याकडून रोहिणी यांचे चोरलेले अर्धे मंगळसूत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू करताच बाकरने आपण महाराष्ट्राच्या विविध भागात ९० हून अधिक चोऱ्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. आता बाकरची चौकशी करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांकडून मागणी होऊ लागली आहे.उपायुक्त ढवळे यांच्या मार्दर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, साहाय्यक निरीक्षक विनोद कडलग यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.