कल्याण – ऐतिहासिक कल्याण शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या प्रवेशव्दारावरील दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूज गुरूवारी रात्री ढासळला. रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडला. कोणीतीही हानी यात झाली नाही. गुरुवारी पडलेल्या पावसाच्या माऱ्याने बुरूजाचा काही भाग खचून हा बुरूज ढासळला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशव्दारावरील डाव्या बाजुला हा बुरूज आहे. शुक्रवारी पहाटे नागरिक दुर्गाडी किल्ल्यावर येऊ लागले. त्यावेळी त्यांना बुरूजाचा दर्शनी भाग कोसळला असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ कल्याण, डोंबिवली शहरात वाऱ्यासारखी पसरली. दुर्गाडी किल्ला हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत येत असला तरी त्यावर नियंत्रण पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे.

हेही वाचा – घोडबंदर उड्डाणपुलांच्या दुरस्ती कामांना दोन दिवसांत सुरुवात, रात्रीच्या वेळेत कामे करण्यात येणार असली तरी कोंडीची शक्यता

पाच वर्षापूर्वी दुर्गाडी किल्ल्याचे दोन बुरूज ढासळले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या बुरूजांची डागडुजी करून ते सुस्थितीत केले होते. बुरूजावरील नवीन कामाला भेगा पडल्या आहेत. आता या नादुरुस्त भागाची देखभाल केली नाहीतर पावसाळ्यात या भागाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती इतिहासप्रेमींंनी व्यक्त केली. दुर्गाडी किल्ला हा निव्वळ दगडावर उभा नसून या किल्ल्याचा काही भाग मातीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात माती खचू लागली की असे प्रकार होऊ शकतात, असे एका जाणकाराने सांगितले. दुर्गाडी किल्ल्याच्या दोन्ही बाजुने २४ तास जड, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्याचे दणके अप्रत्यक्षपणे किल्ल्याला बसत असतात. त्याचाही हा परिणाम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निधी पडून

दुर्गाडी किल्ला सुस्थितीत आणि देखणा असावा म्हणून शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी किल्ला नुतनीकरण कामासाठी २५ कोटीचा निधी गेल्या वर्षी मंजूर केला आहे. या निधीतील साडे सात कोटीचा निधी शासनाने प्रत्यक्ष कामासाठी मंजूर केला आहे. परंतु, या निधीतून वर्ष उलटले तरी दुर्गाडी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले नाही, असे दुर्गप्रेमींनी सांंगितले.

शिवाजी महाराजांनी पहिल्या आरामाराची स्थापना कल्याणमध्ये केल्याचे इतिहासकार सांगतात. या आरामाराच्या किनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करण्यात आली. हे ऐतिहासिक वैभव टिकून ठेवण्यासाठी शासनाने दुर्गाडी किल्ल्याच्या नुतनीकरण, संंवर्धनाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचीन बासरे यांनी केली. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवी मंदिर, मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ, सभोवताली बुरूज आहेत.

हेही वाचा – दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याची निर्दोष सुटका

कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पातून दुर्गाडी किल्ल्याच्या बाजुला खाडी किनारी नौदल आरमार उभारणीचे काम सुरू केले आहे. हा प्रेक्षणिय आणि प्रदर्शनीय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात वाढणार आहे.

माजी नगराध्यक्ष ना. का. आहेर यांच्या कार्यकाळात दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती. बुरूज सुस्थिती करण्यात आले होते. आता बराच काळ लोटला असल्याने दुर्गाडी किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीची आहे ते अस्तित्व कायम ठेऊन नव्याने बांधणी होणे आवश्यक आहे. अन्यथा असे पडझडीचे प्रकार सुरूच राहतील. – श्रीनिवास साठे, कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tower of durgadi fort in kalyan collapsed ssb