कल्याण – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गद्दारी करून ज्यांनी पक्षातून बाहेर पडणे पसंत केले. अशा गद्दारांना मनसे म्हणून आम्ही अजिबात सहकार्य करणार नाही. आमच्या सर्व निष्ठा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आहेत, असे सांगत कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी कल्याण लोकसभा निवडणुकीच्यावेळी पूर्वाश्रमीच्या मनसेच्या पदाधिकारी आता महाविकास आघाडीतून कल्याण लोकसभेत निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांना मनसे कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, असे माध्यमांना स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यानंंतर राज ठाकरे यांंनी मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हापासून मनसेसोबत असलेल्या वैशाली दरेकर यांनी मनसेमध्ये नगरसेविका, सभापती, प्रदेश महिला नेत्या अशी अनेक पदे सांभाळली. मनसेबरोबर त्यांचे न पटल्याने २०१६ मध्ये त्या मनसेतून बाहेर पडल्या. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटल्यानंतर दरेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहणे पसंत केले.

हेही वाचा – श्रीकांत शिंदेंचे ‘कल्याण’; फडणवीसांची ठाण्यात ‘पाचर’, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा

मागील तीन वर्षांपासून शिवसेनेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर विकास कामे, निधी अशा अनेक विषयांवरुन शीत युद्ध सुरू असलेले आमदार पाटील गेल्या सहा महिन्यांपासून थंंड आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पिता-पुत्रा विरुद्धची आपली भूमिका अचानक मवाळ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मागील तीन वर्षे खासदार शिंदे यांनी आमदार पाटील यांना विकास प्रकल्प, कामे, निधीमध्ये ताणून धरले होते. यामुळे आमदार पाटील सतत त्रस्त होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार पाटील त्याचा वचपा काढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु, पाटील यांच्या मवाळ धोरणामुळे आणि मनसेने महायुतीबरोबर जुळते घेतल्याने आमदार पाटील कल्याण लोकसभेसाठी खासदार शिंदे यांना साथ देण्याची चर्चा आहे. फक्त त्यांचे कार्यकर्ते आमदार पाटील यांचे आदेश किती पाळतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

हेही वाचा – डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका

या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते खासदार शिंदे यांच्यावरील जुना राग काढण्यासाठी मनसेच्या माजी पदाधिकारी दरेकर यांना कल्याण लोकसभा निवडणुकीत सहकार्य करतील अशी चर्चा होती. परंतु, आमदार पाटील यांनी मनसेतून फुटून बाहेर पडलेल्या गद्दारांना मनसे कोणत्याही प्रकारची साथ देणार नाही असे सांंगून दरेकर यांच्या विरोधात मनसे काम करणार असल्याचे स्पष्ट संंकेत दिले. मनसेत असताना २००९ मध्ये दरेकर यांनी एक लाखाहून अधिक मते कल्याण लोकसभेत मनसेच्या बळावर मिळवली होती. ही साथ आता मिळणार नसल्याने आणि राष्ट्रवादी, काँग्रेस दरेकर यांना किती साथ देते यावर दरेकर यांचे भवितव्य अवलंंबून आहे.

महायुतीेचे, मनसेचे स्थानिक नेते कल्याण लोकसभेत खासदार शिंदे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश देत असले तरी त्याचे पालन महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते किती करतात यावर खासदार शिंदे यांचे भवितव्य अवलंंबून आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The traitors who left mns will get no help in kalyan lok sabha mns mla pramod patil warning to vaishali darekar ssb