शहापूर: धनगर समाजाला आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याचा घाट सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप करत सोमवारी आदिवासी संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान मुंबई – नाशिक महामार्ग तब्बल दीड तास रोखण्यात आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती.
विविध आदिवासी संघटनांच्या नेतृत्वाखाली शहापुर तालुक्यातील वाडी – वस्त्यांसह भिवंडी, मुरबाड, वाडा येथील हजारो आदिवासींनी मुंबई – नाशिक महामार्ग रोखून धरला. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. यामुळे प्रवासी वाहनांसह माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला. धनगर समाजाला आदिवासी जमातीत आरक्षण देऊ नये या मुख्य मागणीसह आदिवासी भागातील तब्बल १५ हजार शाळा बंदीचे आदेश मागे घ्यावेत, ठाणे येथील अप्पर आयुक्त कार्यालय शहापूर येथे आणणे, कन्या आश्रम शाळांची संख्या वाढवणे, ठक्कर बाप्पा योजना शबरी घरकुल योजना आदीम जमातीच्या घरकुल योजना या प्रकल्प स्तरावर राबविण्यात यावी, आदिवासी आश्रम शाळा यांचा शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे त्यात तात्काळ सुधारणा करावी, तालुकास्तरावर आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहामध्ये ५०० विद्यार्थ्यांची क्षमता असावी, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची दैनावस्था सुधारावी या मागण्या आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीने केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा पुढील काळात मुंबई महानगराला शहापूर तालुक्यातील धरणातून होणारा पाणीपुरवठा खंडित करू असा इशाराही यावेळी आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीने सरकारला दिला.
हेही वाचा… कल्याणमध्ये महिलेवर हल्ला
या आंदोलनात आमदार दौलत दरोडा, शांताराम मोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, सह्याद्री म ठाकूर समाज संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जानू हिरवे, माजी जिल्हापरिषद सदस्य अशोक ईरणक, अविनाश शिंगे यांसह हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी आमदार दौलत दरोडा आणी शांताराम मोरे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे दोन दिवसात बैठक घेऊ असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.