बदलापूरः गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातील पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली. वीज पुरवठा, केंद्रातील दुरुस्ती करून हा पुरवठा शनिवारी सुरळीत होण्याची आशा होती. मात्र सोमवार उजाडला तरी अद्याप शहरतील पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून ऐन दिवाळीत उद्भवलेल्या या समस्येमुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. ऐन सुट्ट्यांमध्ये नागरिकांना टँकर मिळवण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागते आहे.
गुरूवारी सायंकाळी बदलापूर, अंबरनाथसह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. या पावसात बदलापूर शहरातील उल्हास नदीवरील बॅरेज येथील पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली. वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक बाबींमुळे शुक्रवारी पाणी पुरवठा ठप्प होता. शुक्रवारी रात्री हा पुरवठा काही अंशी सुरू झाला होता. मात्र विजेचा पुरवठा आणि इतर कारणांमुळे त्यात अडचणी येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. शनिवारीही अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा झाला.
हेही वाचा… कल्याणमध्ये धूळ नियंत्रणात निष्काळजीपणा, आय प्रभागात दोन विकासकांवर दंडात्मक कारवाई
शहरातील पश्चिम भागात तर तुरळक ठिकाणी अपुरा पुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने नागरिक टँकरच्या शोधात होते. मात्र टँकर मधून पाणी मिळण्याच्या ठिकाणीही गर्दी झाल्याने अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले. रविवारी बदलापूर पश्चिमेतील काही भागात पुरवठा झाल्यानंतर सोमवारी पुन्हा पाणी पुरवठा कमी झाला. पाण्याची जलशुध्दीकरण केंद्रातील पातळी वाढत नसल्याने यात बिघाड झाल्याचे सांगत सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने या जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचे मोटार आणि इतर तांत्रिक दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.
हेही वाचा… कल्याण रेल्वे स्थानकात मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र यार्ड; सहा नवीन फलाटांच्या उभारणीला प्रारंभ
बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाचा पुरवठा कमी झाल्याने बेलीवली जलकुंभ येथे पाणी पातळी कमी झाली आहे, त्यामुळे बदलापूर पश्चिम भागाच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पंप बदलणे आणि इतर अनुषंगिक कामे युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत. येत्या २-३ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा ही विनंती, जीवन प्राधिकरणाच्या अभियंता माधुरी पाटील यांनी केली. मात्र ऐन दिवाळीत पाण्यावाचून बदलापूरकर नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे नागरिकांत आधीच संताप असताना पुन्हा पाणी पुरवठा बाधित झाल्याने नागरिक हतबल झाले आहे.