गेल्या पाच वर्षांपासून शहरातील नागरी सुविधांकडे ढुंकूनही न बघणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अंबरनाथ, बदलापूरमध्ये रस्त्यांची कामे जोरात सुरू केली आहेत. येत्या महिनाभरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, हे त्यामागील कारण आहे. पण हे करतानाही रस्त्याची वरवरची मलमपट्टी करण्यापलीकडे काहीही केले जात नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीत खड्डेमय रस्त्यांचे दुखणे सत्ताधाऱ्यांना
रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था ही पालिका प्रशासनाची प्राथमिक कामे. मात्र मुंबई महानगर प्रदेशातील सध्या वेगाने विस्तारित होत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये या सर्वच आघाडय़ांवर सध्या दुरवस्था दिसून येते. पाच वर्षे या आघाडय़ांवर काहीही न करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता निवडणुकीच्या तोंडावर मात्र या रस्त्यांना वरवरचा मुलामा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र कितीही वरवरची मलमपट्टी केली तरी मूळ दुखणे काही लपून राहिलेले नाही. विद्यमान लोकप्रतिनिधी राजवटीविषयी दोन्ही शहरवासीयांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. नागरिकांच्या मनातील हा रोष काही प्रमाणात कमी करण्यासाठी डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरणाचा देखावा सर्वत्र सुरू आहे. मात्र अजूनही या शहरांमधील बहुतेक रस्ते खड्डेमय असून धूळ व माती तसेच कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी यांमुळे नागरिक त्रस्त व हैराण झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये रस्त्यांवरचे खड्डे आणि तडे सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाहीत, असेच दिसून येते.
अंबरनाथ व बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांची सुमार दर्जाची कामे झाली आहेत. त्याची परिणती रस्त्यांवर खड्डे पडण्यात झाली आहे. तसेच भुयारी गटार योजना हा प्रकल्प आता या शहरांचे दु:स्वप्न म्हणून पुढे येत आहेत. कारण संपूर्ण शहरांमधील सगळेच रस्ते खणून रस्त्याखाली पाइप टाकण्यात येत आहेत, परंतु पाइप टाकल्यानंतर खणलेले रस्ते हे डांबरीकरणाने पूर्ववत करण्याचे काम भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराचे असून ठेकेदाराने ही कामे करण्यात कुचराई करत फक्त मातीनेच रस्ते बंद केल्याचे प्रकार या शहरांमध्ये घडत आहेत. अंबरनाथमध्ये सव्वाशे कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम हे इगल कंपनीला देण्यात आले आहे. शहरातील वांद्रापाडा ते कैलाशनगर रस्त्याचे भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले, परंतु अजूनही ठेकेदाराने रस्ता पूर्ववत करण्याचे काम केलेले नाही. नागरिकांच्या तक्रारीवरून पालिकेने या ठेकेदाराला हा रस्ता पूर्ववत करण्याचे निर्देश दिल्यावर मातीवरच डांबर टाकण्याचे काम या ठेकेदाराने सुरू केले. मात्र ठेकेदाराच्या या कामाकडे लक्ष देण्यास पालिकेचा कोणताही अधिकारी जागेवर नव्हता ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. तसेच ठेकेदार वापरत असलेले डांबराचे मिश्रणही पुरेसे चिकट नाही. त्यामुळे केवळ डांबर ऑइलचा वापर होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दुर्दैवाने प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचे उघड झाले आहे. अंबरनाथमध्ये ६० कोटींची रस्ते काँक्रीटीकरणाची कामे मंजूर झाली असून यात १४ किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार आहेत, तर बदलापूरात ५१ कोटींची कामे मंजूर झाली असून शहरातील पूर्व व पश्चिम भागांतील मिळून प्रमुख दहा रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येणार आहेत. अंबरनाथमध्ये शिवसेनेने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या शिवमंदिर महोत्सवापूर्वी अत्यंत घाईघाईत शिवाजी चौक, रोटरी परिसरातील रस्ते व शहरातील अन्य भागांतील रस्ते डांबरीकरणाची कामे सुरू करून पूर्ण केली. मात्र निकृष्ट दर्जाची कामे केल्याबद्दल या रस्त्यांची तक्रारही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. अशीच परिस्थिती बदलापूर शहरातही असून येथील मोहनानंदनगर ते रेल्वेस्थानक या पश्चिमेकडील केलेल्या रस्त्यावर तडे गेल्याचा प्रकारही निदर्शनास आला आहे. येथील आदर्श शाळा हे दहावीचे केंद्र असून या शाळेच्या प्रवेशद्वारावरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास अडचण निर्माण झाली होती. तर बदलापूरातील अनेक प्रभागांत उशिरा जाग आलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवडणुकांपूर्वीची कामे म्हणून गेल्याच महिन्यात डांबरीकरणाची कामे उरकली आहेत. येथील गोविंदधाम कॉम्प्लेक्ससमोरील अर्धा रस्ता हा चक्क पेव्हर ब्लॉक टाकून करण्यात आला आहे. त्यामुळे अंबरनाथ व बदलापूरमधील या सर्व परिस्थितीला जबाबदार धरून कल्याण महापालिकेप्रमाणे याही पालिकांच्या अभियंत्यांना निलंबित करणार का, हा सवाल येथील जनता करत आहे.
लोकप्रतिनिधींची याला साथ आहे हे उघड आहे. परंतु या परिस्थितीला कंटाळून अंबरनाथच्या शिवसेना शहरप्रमुखांनी चक्क अंबरनाथ पालिकेतील सत्ताधारी सेनेलाच खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याचा इशारा दिला आहे. कारण येथील बी-केबिन भागातील रस्ते चालण्यासही योग्य नसल्याने त्यांनी हा इशारा पालिकेला दिला होता. त्यात अर्थातच पक्षांतर्गत राजकारण होत असल्याचेही दिसून आले आहे. तर, भाजपाचे सत्ताधारी आमदार किसन कथोरे यांनाही ते राबवीत असलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ या अभियानात नागरिकांच्या रस्त्यांवरील प्रश्नांना कसे तोंड द्यावे हा पेच उभा राहिला आहे. तसेच दोन्ही पालिकांच्या बहुतांश प्रभागात भुयारी गटार, काँक्रीटीकरण, डांबरीकरण आदींची कामे सुरूच असल्याने त्यांना मतदारांपुढे मते मागण्यास गेल्यावर त्रस्त नागरिकांच्या रस्ते कधी नीट होणार, या प्रश्नांची सरबत्ती होत आहे. त्यामुळे उमेदवारांचेही धाबे दणाणले असून लाटेवर आरूढ असलेला भाजप असो व आपला पारंपरिक भाग म्हणून खुशीत गाजरे खाणारी शिवसेना असो, या दोन्ही पक्षांना ही निवडणूक जड जाणार आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे येथे राहणारा चाकरमानी वर्ग हवालदिल झाला आहे. सकाळी जाऊन रात्री घरी येताना रस्त्यावरून चालण्याची कसरत त्यांच्या नशिबी पडली आहे. त्यामुळे दारात मते मागायला येणाऱ्या उमेदवारांना हे नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित.
या सत्तेचा मार्ग खड्डय़ातून जातो..
गेल्या पाच वर्षांपासून शहरातील नागरी सुविधांकडे ढुंकूनही न बघणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अंबरनाथ, बदलापूरमध्ये रस्त्यांची कामे जोरात सुरू केली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-03-2015 at 07:37 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The way of this power goes through potholes