ठाणे येथील सॅटीसवरुन बी केबीनच्या दिशेकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टीएमटी बसची धडक एका तरूणीला लागून ती खाली पडली. त्यात, तिच्या दोन्ही पायावरुन बसचे चाक गेल्याने ती गंभीररित्या जखमी झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकारणी बसचालका विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदिनी पाठक (१९) असे तरूणीचे नाव असून ती ठाण्यातील तुळशीधाम भागात राहते. ठाणे सॅटीसवरुन टीएमटी बसगाड्या सोडल्या जातात. सॅटीसवर बसगाड्या खाली तसेच वर येण्यासाठी असे एकूण तीन मार्ग आहेत. त्यात, दोन मार्ग हे बस खाली उतरण्याचे आहेत. त्यामध्ये ठाणे बाजारपेठ ते सॅटीस पूल हा बसगाड्या सॅटीसवर येण्याचा मार्ग आहे. तर, सॅटीस पूल ते तलावपाळी आणि दुसरा म्हणजे सॅटीसपूल ते बी कॅबिन रस्ता हे दोन मार्ग बस खाली उतरण्याचे आहेत. बी- केबीनच्या दिशेकडे येणाऱ्या सॅटीस पुलावरुन नंदिनी तिच्या मैत्रिणीसोबत खाली उतरत होती. त्या दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टीएमटी बसची धडक नंदिनीला लागली. त्यात ती खाली पडली. त्यादरम्यान बसच्या मागील चाक तिच्या पायावरुन गेल्याने तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकारणी बसचालका विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.