ठाणे : विवाह करण्यास नकार दिल्याने महिलेने ३१ वर्षीय व्यक्तीच्या गुप्तांगावर स्वयंपाक घरातील उलथण्याने वार केल्याचा प्रकार भिवंडी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिलेने देखील संबंधित व्यक्तीविरोधात विनयभगांचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, भिवंडी शहरात २६ वर्षीय महिला वास्तव्य करते. तर जखमी तरुण यंत्रमाग कारखान्यात काम करतो. १६ ऑगस्टला तरुणाला संबंधित महिलेने तिच्या घरी बोलाविले. महिलेने त्या तरुणाकडे विवाह करण्याचा तगादा लावला. परंतु तरुणाने नकार दिल्याने महिलेने स्वयंपाक घरातून उलथणे आणले. त्यानंतर त्या तरुणाच्या गुप्तांगावर उलथण्याने हल्ला केला. या घटनेत तरुणाच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर महिलेने देखील तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या घरामध्ये एकट्या असताना तरुणाने घरामध्ये प्रवेश करून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर त्यांनी उलथण्याने तरुणाच्या गुप्तांगावर हल्ला केला. या दोन्ही प्रकरणांत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.