भगवान मंडलिक

डोंबिवली- स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात वाढलेल्या राष्ट्रप्रेम, सीमांवर अहोरात्र सेवा देणाऱ्या लष्करी जवानांविषयी आदरभाव, आस्था असणाऱ्या डोंबिवलीतील एका महिलेने आपल्या निवृत्तीच्या रकमेतील पाच लाख रूपयांचा निधी पुणे येथील भारतीय लष्कराच्या अपंग सैनिक कल्याण केंद्राला दिला. लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल, समपदस्थ अधिकाऱ्यांनी या महिलेकडून एका छोटेखानी कार्यक्रमात साहाय्याचा धनादेश स्वीकारला.

स्नेहा गिरीश चव्हाण-दवते असे या दातृत्ववान महिलेचे नाव आहे. स्नेहा मूळच्या डोंबिवलीकर (दवते बंगला). विवाहानंतर त्या बदलापूर येथे राहण्यास गेल्या. आता माहिम येथील टपाल वसाहतीत राहतात. स्वातंत्र्यसैनिक वडिल बाबुराव दादाजी दवते यांची धाकटी कन्या. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिसमधून ३९ वर्षाच्या सेवेनंतर त्या सेक्शन सुपरवायझर म्हणून नुकत्याच निवृत्त झाल्या. वडिल १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. घरात स्वातंत्र्य लढ्याचे वातावरण होते. ऑगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यात देहू दादा क्रांतीवीराचा गोळी लागून मृत्यू झाला होता. देहू दादांच्या स्मृतिंना उजाळा देण्यासाठी परळ कामगावर मैदानावर क्रांतीवीरांनी मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाचे नेतृत्व बाबुराव दवते यांनी केले होते. पोलिसांनी मोर्चा अडवून मोर्चा प्रमुख बाबुराव दवते व इतरांना अटक केली. पोलीस, न्यायालयीन कोठडी असा सहा महिने बाबुरावांचा मुक्काम घराबाहेर होता. बाबुरावांचे अल्प वय, त्यांचा प्रामाणिकपणा पाहून न्यायालयाने त्यांना दोन हजार रूपयांच्या जामीनावर सोडले.

या कालावधीत घरात क्रांतीविरांची उठबस, स्वातंत्र्य लढ्याविषयी खलबते चालायची. हे सगळ आम्ही लहान असलो तरी आम्हाला कळायचे. या वातावरणातून राष्ट्रप्रेमाचा एक संस्कार आम्हा भावंडांवर झाला. घऱात झेंडा होता. तो घरासमोर फडकवला जायाचा. मोजकी क्रांतीवरी मंडळी यावेळी उपस्थित असायची, असे स्नेहा चव्हाण सांगतात.

भारताच्या सीमेवर गोठणाऱ्या थंडीत, आव्हानात्मक परिस्थितीत कुटुंब, घरदार सोडून जे सैनिक सेवा देतात. त्यांच्याविषयी खूप आस्था होती. त्यांच्यामुळे आपण निर्धास्त, समाधानाने जीवन जगतो. त्यामुळे सैनिकांसाठी काही तरी करायचे अस सारख मनात होत. जन्माला आलोय म्हणजे या देशाचे, समाजाचे आपण देणेकरी आहोत, असे वाटायचे. या विचारातून २०१४ मध्ये लष्करी जवानांना साहाय्यक होईल अशी पाच लाख रूपयांची विमा पॉलिसी काढली. दरमहा थोडी रक्कम या पॉलिसीमध्ये टाकत होते. ३१ मार्च २०२२ ला पाच लाखाची पॉलिसी गठीत(मॅच्युअर) झाली. ही रक्कम सामाजिक, संस्था संघटनेला न देता ती थेट सैनिकांच्या कामी कशी येईल यासाठी लष्कारतून निवृत्त झालेले टपाल कार्यालयातील शिवाजी बजबलकर यांनी स्नेहा चव्हाण यांना मार्गदर्शन केले. मंत्रालयातील अधिकारी, लष्कराच्या मुख्यालयाशी संपर्क करून लष्कराच्या पुणे येथील अपंग मदत केंद्राला पाच लाखाची मदत करण्याचा निर्णय घेतला. लेफ्टनंट कर्नल कोलेन यांनी हा धनादेश स्वीकारला. लष्करी अपंग केंद्रात सीमेवरील जखमी सैनिक, त्यांची कुटुंबे यांचा सांभाळ केला जातो.

सीमेवर उमेदीने काम करणारा सैनिक जखमी होऊन अपंग होतो. तेव्हा तो खचतो. अशा सैनिकांना उभारी देण्याचे काम पुण्याच्या खडकी येथील अपंग केंद्रात चालते. अशा मदतीमधून आपण राष्ट्रकार्याला हातभार लावतो, हा संदेश तरूणापर्यंत गेला पाहिजे, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपण समाजाचे देणेकरी आहोत. राष्ट्रकार्य रस्त्यावर उतरून होते असे नाही तर, आपल्या क्षमतेने आपण योग्यठिकाणी साहाय्य केले तरी त्यामधून मोठे काम उभे राहते. याचे आत्मिक समाधान असते. – स्नेहा चव्हाण, निवृत्त टपाल अधिकारी, डोंबिवली.

Story img Loader