डोंबिवली – ठाकुर्ली, डोंबिवली रेल्वे स्थानक हद्दीतील सरकत्या जिन्यांची कामे मागील चार महिन्यांपासून रखडली आहे. सरकत्या जिन्यांसाठी बांधकाम विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु, विद्युत विभागाकडून सरकत्या जिन्यांची व्यवस्था करण्यात येत असल्याने ही कामे थंडावली आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीन आणि चारवर फलाटाच्या मध्यभागी मागील पाच महिन्यांपासून एक खड्डा सरकत्या जिन्यांसाठी खोदून ठेवला आहे. या खोदकामामुळे प्रवाशांना या भागातून येजा करताना कसरत करावी लागते. निमुळता रस्ता फलाटावर सरकत्या जिन्याच्या भागात आहे. सकाळ, संध्याकाळ या भागातून लोकलमध्ये चढताना प्रवाशांना कसरत करावी लागते. या खड्ड्याच्या चारही बाजूने धोका टाळण्यासाठी हिरवी जाळी लावण्यात आली आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत कोपरमध्ये महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप
या खड्ड्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. विद्युत विभागाकडून सरकत्या जिन्याचे काम हाती घेण्यात येत नसल्याने पाच महिन्यांपासून प्रवासी सरकता जिन्याचे काम कधी पूर्ण होणार या प्रतीक्षेत आहेत. डोंबिवली सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे हे माहिती असूनही या स्थानकातील जिन्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
अशाच पद्धतीने ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर सरकत्या जिन्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम अर्धवट स्थितीत आहे. बांधकाम विभागाने या भागातील काम पूर्ण केले आहे. परंतु विद्युत विभागाचे येथील कामही थंडावले आहे. सरकत्या जिन्याचे काही भाग मिळत नसल्याने ही कामे थांबली असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. ही कामे मे अखेरपर्यंत पूर्ण केली जातील, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वेच्या बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, आम्ही सरकत्या जिना कामासंंबंधीची बांधकामाची उभारणी करून ठेवली आहे. विद्युत विभागाने सरकता जिना उभारणी केली की राहिलेले काम आम्ही पूर्ण करू.
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट तीनवर मध्यवर्ती ठिकाणी सरकता जिना नसल्याने प्रवाशांना पायऱ्या चढून वळसा घेऊन मधल्या स्कायवाॅकवर यावे लागते. ठाकुर्ली पूर्वेत रेल्वे जिन्याला लागून सरकता जिना नसल्याने प्रवाशांना जिना चढून स्थानकात जावे लागते.