गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर एकही खड्डा असू नये म्हणून डोंबिवलीतील सर्व विसर्जन मार्गावरील रस्त्यांवरील लहान खड्डे भरणीची कामे बांधकाम विभागाने सुरू केली आहेत. मनसेने दोन दिवसापूर्वी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विसर्जन मिरवणुक मार्गावर एकही खड्डा दिसणार नाही याची काळजी घेण्याची मागणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.
हेही वाचा >>> कल्याण : शहापूर येथे आदिवासी पाड्यात वीज पडून महिलेचा मृत्यू ; आमदारांकडून कुटुंबीयांना आर्थिक मदत
शुक्रवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती अधिक संख्येने मोठ्या चारचाकी आसनांवरुन खाडी किनारी नेण्यात येणार आहेत. त्यामुळे यावेळी रस्ते सुस्थितीत असावेत म्हणून डोंबिवली बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी डोंबिवली विभागातील खड्डे भरलेल्या सर्व रस्त्यांची पुन्हा पाहणी करुन या रस्त्यांवर सततच्या वाहन वर्दळीमुळे खड्डे पडले असतील ते बुजविण्यास सुरुवात केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पाथर्ली, संत नामदेव पथ भागात आता खड्डे भरणीची कामे करण्यात येत आहेत. मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी बांधकाम विभागाकडे या भागातील खड्डे भरणीची कामे प्राधान्याने करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा >>> कळव्यात घराच्या छताचे प्लास्टर पडून दोघे जखमी
गणपती विसर्जनानंतर सोमवार पासून डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या पण खराब झालेल्या रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक विभागाचे सहकार्य घेऊन हे रस्ते बंद ठेऊन मग डांबरीकरणाची कामे केली जाणार आहेत, असे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले.कल्याण पूर्वेतील चेतना विद्यालय ते मलंग रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे ‘एमएमआरडीए’कडून करण्यात येत आहेत. शासन आदेशाप्रमाणे पालिका हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांची खड्डे भरणीची कामे ‘एमएमआरडीए’कडून केली जात आहेत. यामध्ये नांदिवली स्वामी समर्थ मठ रस्ता, मानपाडा ते विद्यानिकेतन शाळा रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज सांगितला आहे. या अंदाजाप्रमाणे रस्ते सुस्थिती आणि डांबरीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत, असे लोकरे यांनी सांगितले.मागील महिनाभरात डोंबिवली बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता लोकरे यांनी दिवस, रात्र खड्डे भरणीची यंत्रणा कामाला लावून गणेशोत्सवापू्र्वी खड्डे भरणीची कामे पूर्ण करून घेतली. या रस्त्यांवर पुन्हा काही ठिकाणी सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे खड्डे दिसू लागल्याने असे खड्डे भरणीची कामे पुन्हा हाती घेण्यात आली आहेत.