लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोंबिवली, कल्याण परिसरातील मंदिरांमध्ये रात्रीच्या वेळेत दानपेटीमधील रक्कम चोरुन नेण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसापूर्वी २७ गावातील एका मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लुटून नेली होती. ही घटना ताजी असताना, चोरट्यांनी कल्याण पश्चिमेतील घोडेखोत आळीतील दक्षिणमुखी मारुती मंदिरात मंगळवारी पहाटे चोरी करुन दानपेटीतील रकमेसह ९२ हजाराचा ऐवज चोरुन नेला.

मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर ते चोरट्यांकडून पहिले काढून घेतले जातात. ठराविक चोरट्यांची टोळी या चोऱ्या करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. कल्याण पश्चिमेत घोडेखोत आळीमध्ये पुरातन दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. विविध भागातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराच्या चारही बाजुने संरक्षित जाळी आहे. गाभाऱ्याला लाकडी दरवाजा आहे. मंदिर बंद करताना गाभाऱ्याच्या दरवाजाला टाळे लावले जाते. मंदिरातील पूजाअर्चा स्थानिक रहिवासी करतात.

हेही वाचा… डोंबिवलीतील तरुणाची नोकरीच्या आमिषाने फसवणूक

सोमवारी रात्री १० वाजता मंदिर केल्यानंतर चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराच्या बाहेरील लोखंडी जाळ्या धारदार करवतीने कापून मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून गर्भगृहातील दानपेटीतील रक्कम, चांदीचे दागिने असा एकूण ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. मंगळवारी सकाळी भाविक मंदिरात दर्शनासाठी आले. त्यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे समजले. घोडेखोत आळीतील स्थानिक रहिवासी दीपेश देशमुख यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. सी. घोलप तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft at south facing maruti temple in kalyan dvr
Show comments