सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक रहिवासी, व्यापारी, खासगी आस्थापना चालक पर्यटनासाठी, मूळ गावी गेले आहेत. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी रात्री, दिवसा बंद असलेली घरे, दुकाने फोडून रोख रक्कम, सोने, चांदीचा ऐवज, कार्यालयांमधील लॅपटॉप चोरून नेण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या दोन दिवसात डोंबिवली, कल्याणमधील अशा चोऱ्यांच्या माध्यमातून चोरट्यांनी सुमारे चार लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. डोंबिवलीतील रामनगर, टिळकनगर, कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
डोंबिवली पूर्वेतील राजाजी रस्त्यावरील मढवी बंगल्या जवळ सुरेश चौधरी यांचे जय भवानी किराणा दुकान आहे. याच दुकानाला खेटून रोशन मार्टीस यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. सुरेश चौधरी यांनी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता किराणा दुकान बंद केले. मध्यरात्री चोरट्याने दुकानाचा मुख्य दरवाजा लोखंडी कटावणीने उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील चार हजार रूपये किमतीचा सुकामेवा, तुपाचे डबे, चॉकलेट असे सुमारे २० हजार रूपये किमतीचे सामान पिशवीत भरले. किराणा दुकानातून औषध विक्री दुकानात जाण्यासाठी दुकानाच्या आतील बाजुला फर्निचरला भगदाड पाडले. औषध दुकानात घुसून दुकानातील एक लाख ९३ हजार रूपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. दोन्ही दुकानातील एकूण दोन लाखाचे सामान, रोख रक्कम चोरून नेली. दुकान मालक चौधरी सकाळी दुकानात आले. त्यांना दुकानात चोरी झाली आहे, असे दिसले. चौधरी यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
डोंबिवली पूर्वेतील संगीतावाडीमधील सिताराम निवासमध्ये स्वप्नाली संसारे यांचे कार्यालय आहे. चोरट्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून कार्यालयातील लॅपटॉप, ध्वनीक्षेपक असे सुमारे ४० हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. संसारे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.
कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथील सदगुरू कृपा सोसायटीत मनोज मेनन कुटुंब राहते. ते बाहेरगावी गेले होते. घरी परतल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडला असल्याचे दिसले. घरात जाऊन त्यांनी पाहिले तर कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घराचे कागदपत्र, पारपत्र असे हाती लागेल ते सामान गुंडाळून चोरट्याने ७५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. मेनन यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बंद घरं, दुकानावर पाळत ठेऊन रात्रीच्या वेळेत त्या दुकानात चोरी करण्याचा नवा मार्ग चोरट्यांनी अवलंबला आहे. शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही लावूनही चोऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने पोलीसही हैराण आहेत. दोन वर्षात महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगारी वाढली. कामधंदा नसल्याने चांगल्या घरातील तरूण चोरीकडे वळले आहेत, असे पकडलेल्या आरोपींच्या चौकशीतून दिसून येते, असे एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.