डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील राजाजी रस्त्यावरील एका बंद घराचा कडीकोयंडा दिवसाढवळ्या तोडून चोरट्याने घरात घुसून सोन्याचा दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. सर्वाधिक वर्दळीच्या राजाजी रस्त्यावर हा प्रकार घडल्याने या भागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत चालकांना रस्त्यांवरील भटक्या गुरांच्या बैठकांचा अडथळा

किरण विजय जैन (४९, रा. मयुरदीप सोसायटी, राजाजी पथ, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, किरण जैन या सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. या संधीचा गैरफायदा पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने घेतला. त्याने घाईने येऊन किरण जैन यांच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. घरात प्रवेश करुन कपाटातील तिजोरीतील सोन्याचा एक लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

किरण या अर्ध्या तासाने परत आल्या. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांना घरात चोरी झाली असल्याचा संशय आला. त्यांनी घरात प्रवेश करुन कपाट पाहिले असता ते उघडे दिसले. घरातील सामानाची फेकाफेक करण्यात आली होती. तिजोरीतील सोन्याचा ऐवज गायब असल्याचे त्यांना दिसले. चोरी झाल्याने किरण यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

अर्धा तासाच्या आत चोरट्याने ही चोरी केली असल्याने पाळत ठेऊन ही चोरी झाली असण्याचा संशय पोलिसांना आहे. मयुरदीप सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Story img Loader