डोंबिवली : नातेवाईक असलेल्या एका महिलेने एका व्यावसायिकाच्या घरात दोन लाख ५४ हजार रूपयांची चोरी केली आहे. घरा समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा चोरीचा प्रकार कैद झाला आहे. नातेवाईक महिलेनेच ही चोरी केली असल्याची खात्री पटल्यावर व्यावसायिक असलेल्या भाडेकरूने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून चोरी करणाऱ्या महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

एक २५ वर्षाचा तरूण व्यावसायिक आपल्या भाऊ, वहिनी यांच्यासह डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील लोढा एक्सपेरिया गृहसंकुल भागात राहतो. या तरूण व्यावसायिकाने आपल्या नातेवाईक महिलेच्या माहितीमधून लोढा एक्सपेरिया गृहसंकुलात हे घर भाड्याने घेतले आहे. हा २५ वर्षाचा तरूण व्यावसायिक कंपन्यांना प्लास्टिकचे ड्रम पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो. या व्यवहारातून जे रोखीने मिळतात तो ते पैसे घरातील कपाटातील तिजोरीत ठेवतो.

लोढा एक्सपेरिया गृहसंकुलात भाड्याने घर घेतल्यानंतर घर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या नातेवाईक महिलेने व्यावसायिकाला घराच्या मुख्य आणि सुरक्षित दरवाजा यांच्या दोन चाव्या सुरुवातीला ताब्यात दिल्या. या नातेवाईक महिलेवर पूर्ण विश्वास ठेऊन व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी सदनिका भाड्याने घेतली होती. काही दिवसांनी पुन्हा नातेवाईक महिलेने व्यावसायिकाला मुख्य आणि संरक्षित दरवाजाच्या चाव्या आणून दिल्या. महिला नातेवाईक असल्याने आणि तिच्यावर विश्वास असल्याने चाव्या एवढ्या उशिरा का दिल्या म्हणून व्यावसायिकेने प्रश्न उपस्थित केले नाहीत.

प्लास्टिक पिंप विक्रीतून मिळालेले सहा लाख ८० हजार रूपयांची रक्कम व्यावसायिकाने आपल्या भाड्याच्या घरातील कपाटातील तिजोरीत ठेवली होती. त्यानंंतर ते आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे गेले होते. तेथून परतल्यावर त्यांनी कपाटातील तिजोरीतील रक्कम तपासली. त्यात त्यांना दोन लाख ५४ हजार रूपये कमी आढळले. घरात चोरी झालेली दिसत नाही. घरात कोणीही आले नसताना, आपण रक्कम कोठे भरणा केलेली नसताना रक्कम गेली कोठे, असा प्रश्न व्यावसायिकाला पडला. त्यांनी उत्सुकतेपोटी राहत्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी धक्कादायक माहिती पुढे आली.

ज्या नातेवाईक महिलेच्या पुढाकाराने व्यावसायिकाने लोढा एक्सपेरियामध्ये भाड्याने घर घेतले होते. ते घर नातेवाईक महिलेने जवळील चाव्यांनी दोन वेळा उघडले असल्याचे आणि त्या १५ मिनीट या भागात वावरत असल्याचे निदर्शनास आले. नातेवाईक महिलेनेच घरातील अडीच लाखाची रक्कम चोरून नेल्याचा संशय घेत व्यावसायिकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Story img Loader