टिटवाळ्यात इस्त्रीचे दुकान चालविणाऱ्या परिचित व्यावसायिकाने शिक्षिकेच्या घरात जाऊन ७० हजार रुपयांची चोरी केली आहे. शुक्रवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी व्यावसायिकाला अटक केली आहे.
हेही वाचा- गुंड गणेश जाधव हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
पोलिसांनी सांगितले, टिटवाळ्यात डीएनएस बँकेच्या पाठीमागे असलेल्या श्री सिध्दीविनायक संकुलामध्ये एक शिक्षिका आपल्या कुटुंबासह राहते. याच भागातील इस्त्री दुकानदार विनोद कनोजिया याने या शिक्षक कुटुंबाला भाड्याने सदनिका घेऊन देण्यात मदत केली आहे. या संकुलाच्या तळमजल्याला विनोदचे दुकान आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात गोळीबार, कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या
विनोद आणि शिक्षिका कुटुंब एकमेकाला परिचित झाले होते. या शिक्षिकेचा पती रात्रपाळी नोकरीसाठी गेला होता. तो सकाळी येण्याची वेळ झाली होती. म्हणून शिक्षिकेने घराच्या दरवाजाला कुलुप न लावता तो फक्त ओढून घेऊन ती शाळेत निघून गेली. या संधीचा गैरफायदा घेत विनोदने शिक्षिकेचा पती कामावरुन येण्यापूर्वीच त्यांच्या घरात शिरुन कपाटातील सोन्याचे ६९ हजार ५०० रुपयांचे दागिने काढून घेतले आणि पळ काढला.
हेही वाचा- वाढदिवस जीवावर बेतला; चार तरूणांचा बदलापुर जवळील कोंडेश्वर कुंडात बुडून मृत्यू
घरी आल्यानंतर शिक्षिकेच्या कपाटातील दागिने गायब असल्याचे आढळले. तिने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. शिक्षिकेने विनोदवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी विनोदची चौकशी सुरू करताच त्याने या चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे या प्रकरणाचा तपास करत आहेत.