डोंबिवली – येथील पश्चिम भागातील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी पहाटे चोरट्यांनी दोन सराफा दुकानांत चोरी करून लाखो रुपयांचा सोने, चांदीचा ऐवज लुटून नेला. पळून जाताना चोरट्यांनी आपला थांगपत्ता लागू नये म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर नेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकाच रात्रीत दोन सराफा दुकाने फोडल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. करोना महासाथीच्या दोन वर्षांत सराफ व्यवसाय मंदीत आहे. आता कुठे आम्ही उभारी घेत आहोत. विवाह सोहळ्यांचा हंगाम चालू आहे. त्यात ही चोरी झाल्याने दोन्ही दुकानांच्या मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – ठाणे स्थानकासह तलावपाळी परिसराने घेतला मोकळा श्वास; पालिकेच्या कारवाईमुळे फेरिवाले झाले गायब

जबरदास वैष्णव यांचे चिंचोड्याचा पाडा भागात श्री बालाजी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. तर कर्वे रस्त्यावर भागशाळा मैदान भागात राहणाऱ्या नारायण रायकर यांचे रायकर ज्वेलर्स दुकान आहे. दोन्ही दुकाने वर्दळीच्या रस्त्यावर आहेत. चोरट्यांनी पहाटे तीन ते पाच वाजताच्या दरम्यान दुकानांचा दर्शनी दरवाजा फोडून दुकानात प्रवेश केला. १३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लुटून पलायन केले. आपली ओळख पोलिसांना पटू नये किंवा आपला माग पोलिसांना काढता येऊ नये म्हणून चोरटे सराफा दुकानांतील सीसीटीव्ही, डीव्हीआर काढून घेऊन गेले.

दुकान मालक जबरदास वैष्णव, नारायण रायकर हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यानच्या काळात पहाटेच्या वेळेत चोरट्यांनी दुकानाची मुख्य प्रवेशद्वारे लोखंडी कटावणीने फोडून आतील लोखंडी जाळ्या तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ऐवज, सव्वा लाखाची रोख रक्कम लुटून पलायन केले. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दुकाने आहेत. रिक्षा, पादचाऱ्यांची पहाटे वर्दळ असते. अशा परिस्थितीत चोरट्यांनी या भागात चोरीचे धाडस केल्याने दुकानदारांनी आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा – ठाणे : रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमणांवर हातोडा, उल्हासनगर महापालिकेची कारवाई

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी तपास पथके तयार करुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा शोध सुरू केला आहे. गेल्या वर्षी दावडी भागात एका जवाहिऱ्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला होता.
डोंबिवलीतील वाढत्या भुरट्या, घरफोड्यांमुळे नागरिक, व्यापारी हैराण आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft in two jewleery shops in dombivli in one night ssb