ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात संगणक दुरूस्त करण्याच्या बहाण्याने शिरून एकाने संगणकामधील प्रोसेसर चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चोरट्याने संगणकातील शासकीय डेटा चोरी केले का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील बाजारपेठ परिसरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. कार्यालयातील संगणकांच्या देखभाल दुरूस्तीचे काम हे एका खासगी कंपनीकडून केले जाते. ११ नोव्हेंबरला कार्यालयातील साहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याच्या संगणकामध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला संपर्क साधून संगणक दुरूस्त करण्यासाठी बोलावले. त्यानंतर दुपारी अचानक एक शासकीय बैठक असल्याने सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यासह विभागातील काही कर्मचारी बैठकीस गेले.

हेही वाचा: “मच्छर चावला तर राजन विचारे म्हणतील तो मुख्यमंत्र्यांनीच पाठवलाय”; नरेश म्हस्के यांची राजन विचारेंवर टीका

बैठक संपल्यावर विभागातील कर्मचारी आले. त्यानंतर कंपनीतील कर्मचारी त्याठिकाणी आला. त्याने संगणक दुरुस्त करण्यासाठी घेतला असता त्यामधील प्रोसेसर गायब होता. याप्रककणी विभागातील एका कर्मचाऱ्याला विचारले असता, यापूर्वी एकजण दुरूस्तीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रोसेसर चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी नुकताच सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft of computer processor in thane zilla parishad health department tmb 012