कल्याण – येथील पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बसमधून भुरट्या चोराने एका प्रवाशाची नजर चुकवून त्याच्या जवळील २९ हजार रुपयांचा ऐवज असलेला पैशाचा बटवा चोरून नेला. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
मिथिलेश बारगल (६२) हे सेवानिवृत्त आहेत. सोमवारी दुपारी ते कल्याणमध्ये आले होते. ते कल्याण पश्चिमेतील मॅक्सी ग्राउंडजवळील एका संकुलात राहतात. कामे उरकल्यानंतर ते पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दीपक हाॅटेलजवळील केडीएमटीच्या बस थांब्यावर गेले. आंबिवलीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. बसमध्ये गर्दी असल्याने त्यांनी सोने, चांदी, पैशांचा बटवा हाताच्या काखेत अडकून ठेवला होता. दुपारची वेळ असताना भुरट्या चोराने तक्रारदार मिथिलेश यांना काही कळू न देता त्यांच्या काखेतील २९ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज असलेला बटवा हळूच काढून घेतला. बसमधून उतरून पळून गेला.
हेही वाचा – बदलापूरः ऑनलाईन पैसे कमावणे पडले महागात , सात दिवसात २३ लाखांचा गंडा
मिथिलेश यांनी तिकिटासाठी पैसे काढण्यासाठी बटवा पाहिला तेव्हा जवळ बटवा नसल्याचे दिसले. त्यांनी बसमध्ये, खाली उतरून पाहिले पण बटवा नव्हता. भुरट्या चोराने बटवा लंपास केल्याचा अंदाज आल्याने त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.