लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: घराच्या परिसरात, रस्त्यावर उभी करुन ठेवलेली दुचाकी, रिक्षा रात्रीच्या वेळेत बनावट चावीने सुरू करुन चोरुन नेणाऱ्या दोन चोरट्यांना रामनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. दारु पिण्याची हौस भागविण्यासाठी ते चोरीचा उद्योग करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

श्रीकांत शेडगे (४९, रा. पिसवली), विक्रम साळुंखे (४३, रा. विठ्ठलवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. श्रीकांत तंत्रज्ञ, विक्रम रिक्षा चालक आहे. ठाकुर्ली चोळे गाव भागातून एका नागरिकाची रिक्षा रात्रीच्या वेळेत चोरीला गेली होती. रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून शोध सुरू केला. यावेळी दोन इसम रिक्षा चोरी करत असल्याचे पोलिसांना दिसले.

हेही वाचा… खारघरहून परतलेल्याला मुरबाडच्या श्रीसेवकाचा मृत्यू; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांकडून दावा

पोलिसांनी दोन्ही चोरट्यांची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला होता. शिळफाटा रस्त्यावरील पिसवली येथे एका भंगार दुकानात दोन जण रिक्षेचे सुट्टे भाग विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती रामनगर गुन्हे शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार नीलेश पाटील, प्रशांत सरनाईक यांना मिळाली होती. पोलिसांनी पिसवली भागात सापळा लावला होता. ठरल्या वेळेत दोन जण रिक्षेचे सुट्टे भाग घेऊन पिसवली भागात येताच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांना दारुचे व्यसन जडले होते. जवळील पैशातून दारु पिण्याची हौस भागत नव्हती. म्हणून ते चोरी करुन मिळेल ती वस्तू विकून दारू पिण्याची हौस भागवत होते, असे उघड झाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft of vehicles in dombivli to satisfy the craving for alcohol dvr
Show comments