डोंबिवली – येथील पूर्व रेल्वे स्थानक भागातील सहा दुकाने चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडली. या दुकानांमधील लाखो रुपयांचे सामान चोरट्यांनी चोरून नेले. रामनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील दुकानांमध्ये चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे.

या वाढत्या चोऱ्यांमुळे डोंबिवलीतील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दुकानामध्ये होणाऱ्या घटना, चोरीची माहिती मिळावी म्हणून बहुतांशी दुकानदारांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु, दुकानात प्रवेश करण्यापूर्वी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलतात किंवा या कॅमेऱ्यांचा डीव्हीआर पळून नेत असल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा – टिटवाळा-शिळफाटा मार्गावरील डोंबिवलीतील वळण रस्ते कामाला प्रारंभ

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रामनगर विभागात चोरट्यांनी वाहतूक कार्यालयाजवळील एका रांगेत असलेली सहा दुकाने फोडून दुकानातील लाखो रुपयांचे सामान चोरून नेले. रेल्वे स्थानकाजवळील या भागात प्रवाशांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत चोरट्यांनी दुकानांमध्ये चोरी केल्याने व्यापारी अस्वस्थ आहेत. रामनगर पोलीस ठाण्याजवळ हा परिसर येतो. सायबर कॅफे, मोबाईल विक्री, झेराॅक्स दुकानांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. उर्सेकरवाडीमधील दुकाने फोडण्यात आली आहेत. या दुकानांमधील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तीन चोरटे चोरी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. व्यापाऱ्यांनी या चोरी प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा – सीएसएमटी-कल्याण लोकलमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवाशांचा गोंधळ

चोरी करताना चोरट्यांनी दुकानांची दर्शनी भागातील लोखंडी शटर धारदार लोखंडी सळईने उघडून मग दुकानात प्रवेश केले असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसत आहे.

Story img Loader