कथेचे बीज मनात आकाराला आले असले तरीही कागदावर ते उतरवताना त्यात अनेक बदल घडत असतात. चिवटपणे ती पुन:पुन्हा लिहीत राहिल्याने माझी कथा एका बैठकीत कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पाच-सहा वेळा तरी तिचे पुनर्लेखन केले जाते. किंबहुना, ती प्रकाशित झाल्यानंतर काही काळाने वाचली, तर वाटते, की या अमुक जागी वेगळ्या प्रकारे लिहिता आले असते. या टप्प्यावर माझ्या अण्णांची, विद्याधर पुंडलिकांची उणीव फार तीव्रतेने जाणवते. आज जर ते असते तर मनातील प्रश्न अथवा कथेविषयी त्यांच्याशी चर्चा करता आली असती व माझ्या लेखनाला निराळे आयाम मिळाले असते, अशा शब्दात आपल्या भावनांना मनमोकळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी केला.
ठाण्यातील ‘वाचू आनंदे-घरपोच वाचनालय’च्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गप्पांच्या कार्यक्रमात लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी मुक्तसंवाद साधला. हिरानंदानी इस्टेटमधील वाचनालयात रंगलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी वैयक्तिक आयुष्यातील आठवणी आणि लेखनातील अनुभव त्यांनी या वेळी कथन केले.
त्यावेळी मोनिका यांच्या आई रागिणी पुंडलिकही उपस्थित होत्या. शाळकरी वयात भावाच्या अपघाती मृत्यूने मनावर खोलवर परिणाम झाला होता. आपल्या मैत्रिणी आनंदी, उत्फुल्ल कशा काय जगू शकतात याचे त्या वेळी आश्चर्य वाटत होते. दु:खात माणसे कशी वागतात, त्या कटू प्रसंगाला कसे सामोरे जातात हे मला वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करावेसे वाटले. अशा व्यक्तींचा स्वीकार केल्याने ती चांगल्या पद्धतीने उलगडतात. हेच लेखणीचे सामथ्र्य किंवा मर्यादासुद्धा असू शकतात. तरीही आनंदी आणि सुखी शेवट असलेल्या कथाही प्रकाशित होत असून त्या वाचून वाचकांना आनंद देण्याचा प्रयत्नही केला असल्याचे मोनिका यांनी सांगितले. वाचकाला ज्याप्रमाणे वाचनातून काही गवसत असते आणि त्याचे परिणाम त्याच्या विचारांवर होत असतात. तसेच लेखकावरही त्याच्या स्वत:च्या लिखाणाचा परिणाम होतो असतो. स्वत:च्या लिखाणातून वीस वर्षांपूर्वीची मोनिका आणि आत्ताची मोनिका यात खूपच फरक पडला आहे.
पूर्वीचा संताप आता शांत झाला आहे. त्याचे कारण माणसांचा आणि परिस्थितीचा स्वीकार केल्यास होणारा त्रास टाळता येतो. आपले घर, वडील इतरांपेक्षा वेगळे असल्याचे समजत होते. लेखक आमच्या घरी येत असत. त्यांच्या गप्पा, चर्चा त्या वयात समजत नसूनही आवडत होत्या. लेखणात व्यस्त असलेल्या वडिलांना कधी कधी मुलींच्या इयत्तेचा सुद्धा पत्ता नसायचा, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Story img Loader