मुंबई तसेच ठाणे महापालिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा नदीवरील पिसे येथील बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील आठ दिवस चालणाऱ्या या दुरुस्ती कामासाठी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी केली जाणार असल्यामुळे ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात होणार आहे. यामुळे दुरुस्ती काम पुर्ण होईपर्यंत म्हणजेच पुढील आठ दिवस शहराच्या काही भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>ठाणे : दिवाळीत ॲानलाईन खरेदी करताना सावधान
ठाणे आणि मुंबई महापालिकेला भातसा नदीवरील पिसे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ११ ऑक्टोबरपासून हे काम सुरु करण्यात आले असून त्यासाठी नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे या दुरुस्ती कामाचा फटका ठाणे महापालिकेला बसला आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आल्याने ठाणे महापालिकेला बंधाऱ्यातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नसून यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात दहा टक्क्यांनी कपात झाली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. तोपर्यंत ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात लागू राहणार आहे. परिणामी ठाणे शहरातील गावदेवी, कोपरी, टेकडी बंगला, किसननगर, हाजुरी व इंदिरानगर या भागात कमी पाणी पुरवठा होणार असून यामुळे या भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.