डोंबिवली – मागील अनेक वर्षांची ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. या घोषणाचे स्वागत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानण्यासाठी सोमवारी डोंबिवलीत ब्राह्मण महासंघाने शहरभर लावलेल्या फलकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मागील अनेक वर्षांपासून ब्राह्मण महासंघातर्फे शासनाकडे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात होती. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात या मागणीची सरकारने कधीच दखल घेतली नाही. पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाने वेळोवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटी घेऊन ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी चालू ठेवली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. आता आगामी निवडणुकांचा विचार करून शिंदे-फडणवीस सरकारने सोमवारी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापन केली.
अनेक वर्षाच्या मागणीची ही घोषणा होताच डोंबिवलीत ब्राह्मण महासंघाने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमा असलेले आभाराचे फलक डोंबिवली शहराच्या विविध भागात लावले आहेत. या फलकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा नाही. त्यामुळे चर्चां, शंकाकुशंकाना उधाण आले आहे. काँग्रेस राजवटीच्या काळात अजित पवार सत्तास्थानी होते. त्यावेळी त्यांनी या विषयात कधीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे पवार यांचा फलकावर छायाचित्र नसेल, असाही सूर आळवला जात आहे. सत्ता चालविण्यासाठी पक्षात कोणीही घेतले तरी हिंदुत्वाचा नारा देत आम्ही हिंदुत्ववादी पक्षांनाच मानणार, असे संकेत या फलकाच्या माध्यमातून देण्याची आल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – मुरबाडमधील तरुणाचे हात कापणारे दोन जण अटकेत, हल्लेखोर माजी सभापती श्रीकांत धुमाळ फरार
ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे हे विषय वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच्या बैठकीत चर्चेला आले. त्यांच्या बरोबर महासंघाच्या चर्चा, भेटी झाल्या. त्यामुळे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे पहिल्या दिवसापासूनचे श्रेय शिंदे, फडणवीस यांचे असल्याने त्यांच्या प्रतिमा फलकावर लावल्या आहेत. पवार यांची प्रतिमा लावली असती तर डोंबिवली शहर परिसरातील इतर नेत्यांच्या प्रतिमा लावाव्या लागल्या असत्या. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. – मानस पिंगळे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ, डोंंबिवली.