राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जनावरांना लंपी या आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली असली तरी ठाणे जिल्ह्यात मात्र अद्याप या आजाराचा शिरकाव झालेला नसल्याची बाब पुढे आली आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने काळजी घेण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शेतकऱ्यांना या आजाराविषयी पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्यात जनावरांना हा आजार कशामुळे होतो आणि आजाराची बाधा होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी यासंबंधीचे मार्गदर्शन केले जात आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी येत्या आठवड्याभरात १० हजार लसींचा साठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> ठाण्यातील जोशी कुटुंबाच्या गणेशोत्सवाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष

राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये जनावरांना लंपी सदृष्य रोगाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यापाठोपाठ अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यामध्ये जनावरांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले. ठाणे जिल्ह्यात अद्याप तरी जनावरांना लंपी या आजाराची लागण झालेली नाही. परंतु या आजाराजच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषद पशु संवर्धन विभाग सर्तक झाला असून त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. या रोगाचा संसर्ग केंप्रीपाॅक्स विषाणुमुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषीत चारा-पाणी यामुळे या रोगाचा प्रसार होतो. या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हा परिषद पशु संवर्धन विभागाकडून पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली : नोकरीचे आमिष दाखवून डोंबिवलीत विद्यार्थीनीची फसवणूक

आजाराची लक्षणे
अंगावर १० ते २० मिमी व्यासाच्या गाठी, सुरुवातीस भरपुर ताप, डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद, दुध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सुज येणे व लंगडणे, ही आजाराची लक्षणे आहेत.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास, गोचिड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे, तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करणे, अशी पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्घन विभागाने केले आहे.

ठाणे जिल्ह्यात जनावरांना होणारा लंपी या आजाराचा शिरकारव झालेला नाही. परंतु राज्याच्या इतर जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाल्याची माहिती समोर येत असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील एखाद्या जनावरामध्ये लंपी आजार सदृश्य लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे.