एकीकडे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची लगबग सुरू असताना दुसरीकडे बदलापुरात गणेशोत्सव पुरवठा झाला. तर अनेक उंच भागात सकाळी पाणीच पोहोचले नाही. त्यामुळे गणपतीची तयारी करण्यापूर्वी गणेश भक्तांना टँकरसाठी धावाधाव करावी लागली. गेल्या काही दिवसांपासून शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे. त्यामुळे सणांच्या दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरुद्ध नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

हेही वाचा >>> ठाणे : कोपरीला वाढीव वाढीव पाणी मिळाले तरी पाणी टंचाई मात्र कायम ; अनेक इमारतींमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा

चौथी मुंबई म्हणून बिरुदावली देत लोकप्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून कौतुक केल्या जाणाऱ्या बदलापूर शहरात प्राथमिक सोयीसुविधांची वानवा वारंवार दिसून येते. शहरात एकीकडे मेट्रोची स्वप्ने पाहिली जात असताना शहराला अखंडित वीज पुरवठा देण्यात महावितरणला यश आलेले नाही. त्यात पाणी प्रश्न बारमाही असतो. वर्षाच्या सर्वच महिन्यात बदलापूर शहरातल्या कोणत्या न कोणत्या भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. विशेष म्हणजे ज्या उल्हास नदीवर पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. ती उल्हास नदी बारमाही वाहते. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराविरुद्ध संताप आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर पाणी समस्या घेऊन विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांचे समूह धडकत आहेत. त्यानंतरही पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. त्यात आता गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे.

हेही वाचा >>> कल्याण : वाहतूक पोलिसाला ठोकर देणाऱ्या दुचाकी स्वाराला दोन वर्षाचा कारावास

खरेदी, सजावट आणि साफसफाईच्या कामांना सर्वत्र वेग आला आहे. या सर्व गोष्टींची लगबग सुरू असताना बदलापुरात पाणी टंचाईच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलापुरातील उंच भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यात गणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मंगळवारी बदलापुरात बहुतांश भागात पुन्हा कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. तर अनेक उंच भागात अवघे काही मिनिट पाणी आले. त्यामुळे अनेक गृहसंकुलामध्ये पाणी सोडले गेले नाही. परिणामी नागरिकांची तारांबळ झाली. सकाळी सकाळी गणेशोत्सवाच्या तयारीला लागण्यापूर्वी गणेश भक्तांना पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यासाठी धावाधाव करावी लागली. त्यामुळे नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त करत होते.

Story img Loader