ठाणे: स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजनेतील दैनंदिन देखभाल, दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला पाणी पुरवठा होणार नसून यामुळे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. बंदच्या भागांमध्ये महापालिकेच्या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना २४ तासाऐवजी केवळ १२ तास पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. त्यापैकी स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजनेतील दैनंदिन देखभाल, दुरुस्तीची कामे बुधवारी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. यामुळे बुधवार, २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते गुरूवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ या कालावधीत शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा… शिळफाटा रस्त्यावर गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी; रस्ता दुभाजकांमधून वाहनांची घुसखोरी
परंतु येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून महापालिकेने स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा या भागाचा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत बंद राहील. समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याचा व मुंब्र्याचा काही भागात बुधवारी रात्री ९ ते गुरूवारी सकाळी ९ यावेळेत पाणीपुरवठा बंद राहील. यामुळे नागरिकांना २४ तासांऐवजी १२ तासाच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.