लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन प्रारुप विकास आराखड्याच्या माध्यमातून कळवा-खारेगाव भागातील अधिकृत जुन्या इमारतींचा पुनर्विकास रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केला. उद्दीष्ट ठेवून तयार केलेल्या या विकास आराखड्यामुळे संपुर्ण कळवा-खारेगाव उदध्वस्त होणार असून त्याचा बोलविता धनी कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या आरोपांमुळे ठाणे महापालिकेने तब्बल २१ वर्षानंतर तयार केलेल्या ठाणे शहराचा नवीन प्रारुप विकास आराखडा वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

कळवा परिसरातील त्रिमुर्ती, सह्याद्री, सुदामा अशा अधिकृत इमारतींच्या भागातून विकास आराखड्यात रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. खारेगावमध्ये खूप जुनी घरे आहेत. मंदीरे आहेत. त्याठिकाणीही रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी २४ मीटर तर काही ठिकाणी २० मीटरचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. अशा रस्त्यांच्या ठिकाणी नियमानुसार काही भाग सोडून इमारती उभाराव्या लागतात. परंतु उर्वरित जागेत इमारतींचा पुनर्विकास करणेच शक्य होणार नाही. त्यामुळेच नवीन प्रारुप विकास आराखड्याच्या माध्यमातून कळवा-खारेगाव भागातील अधिकृत जुन्या इमारतींचा पुनर्विकास रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे महापालिकेने विकास आराखड्यातील नागरिकांना बेघर करणारे प्रस्तावित रस्ते रद्द करावेत अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल. हे एका पक्षाचे आंदोलन नसेल तर सर्वांना घेऊन हे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आणखी वाचा-आज हंगामातील सर्वात थंड दिवस बदलापुरात सर्वात कमी ११.९ अंश सेल्सिअसची नोंद

४५ हजार रहिवाशी बेघर होणार ?

ठाणे महापालिका क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन प्रारुप विकास आराखड्यात कळवा-खारेगाव भागातील अधिकृत जुन्या इमारतींच्या भागातून रस्ते प्रस्तावित करण्यात आले असून यामध्ये ५०० इमारतीत बाधित होऊन ४५ हजार रहिवाशी बेघर होतील, अशी भिती आमदार आव्हाड यांनी व्यक्त केली. तिसऱ्या खाडी पुलामुळे कळवा-खारेगाव भागात सद्यस्थिती वाहतूक कोंडी होत नाही. तसेच खाडी मार्गे आणि खारेगाव येथून महामार्गाला जोडणारा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव यापुर्वीच दिला आहे. त्यामुळे भविष्यातील कोंडी कमी करायची असेल तर ते रस्ते तयार करा. परंतु ते रस्ते तयार करण्याऐवजी विशिष्ठ उद्दीष्ट ठेवून तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामुळे संपुर्ण कळवा-खारेगाव उदध्वस्त करणार असून याचा बोलविता धनी कोण आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

पालिकाचे नवा आराखडा वादात

ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्याची फारशी अंमलबजावणी झाली नसल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, ठाणे महापालिकेने तब्बल २१ वर्षानंतर ठाणे शहराच्या नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. काही दिवसांपुर्वी कळव्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी नवीन विकास आराखड्यातील नियोजित रस्ता भुमिपुत्रांना उदध्वस्त करण्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविणारा असल्याचा आरोप केला होता. हा रस्ता रद्द करण्याची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. त्यापाठोपाठ आता कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही नवीन प्रारुप विकास आराखड्याच्या माध्यमातून कळवा-खारेगाव भागातील अधिकृत जुन्या इमारतींचा पुनर्विकास रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्याने हा आराखडाच वादात सापडला आहे.

आणखी वाचा-तलाक, तलाक, तलाक… म्हणत पत्नीला घराबाहेर काढले महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रासाठी नवीन प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती किंवा सुचना असतील तर, त्यांनी त्या लेखी आमच्याकडे सादर कराव्यात. ११ डिसेंबरपर्यंत हरकती आणि सुचना नोंदविण्याची अंतिम मुदत आहे. नागरिकांनी सबळ पुरावे सादर केले तर आम्ही समितीपुढे पाठवून त्यात आवश्यक तो बदल करू, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक कुणाल मुळ्ये यांनी सांगितले.