ठाणे : ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटातील राडे प्रकरण थंड होताना दिसत नाही. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. येथील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रतिक राणे यांच्यात आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा शाब्दिक वाद झाला. करोनामध्ये फक्त एकनाथ शिंदे आपल्या मदतीस आले होते. असे शिंदे गटाचे पदाधिकारी म्हणताच एकनाथ शिंदे यांना आम्हाही निवडून दिले. ते त्यांचे काम होते, असे म्हणत राणे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सुनावले. शाब्दिक चकमकीनंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते निघून गेले. याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम वागळे इस्टेट भागात घेतला आहे. शुक्रवारी रात्री प्रतिक राणे हे कार्यकर्त्यांसह सदस्य नोंदणीचे काम करत असताना, अचानक शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी आले. त्यानंतर राणे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
हेही वाचा: डोंबिवली: हिरकणी प्रतिष्ठानच्या सायकल स्पर्धेत ६४ वर्षाच्या आजीबाईंनी चालवली सायकल
करोनाच्या काळात एकनाथ शिंदे हे आपल्यासाठी धावून आले होते. असे शिंदे गटाचे पदाधिकारी म्हणताच राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. शिंदे यांना आम्हीही निवडून दिले होते. ते त्यांचे काम होते. आता मी माझा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे. मला कोणी रोखू शकत नाही. असे ते म्हणाले. बराचवेळ शाब्दिक चकमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शिंदे गटाचे कार्यकर्त्ये तिथून निघून गेले.