कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांचे मोबाईल, दागिने चोरणाऱ्या पालघऱ् तालुक्यातील डहाणू येथील एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. अहमदाबाद-कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची सोन्याचा ऐवज असलेली पिशवी चोरणाऱ्या चोरट्याचा शोध घेताना डहाणुचा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला.
हेही वाचा- विविध मागण्यांसाठी ठाण्यात आदिवासी संघटनेचा मोर्चा
अहमदाबाद-कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची सहा लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याचा ऐवज असलेली पिशवी याच चोरट्याने चोरल्याचे तपासात पुढे आले आहे. सुभान अहमद जहीर अहमद (४१) असे आरोपीचे नाव आहे. मागील दहा दिवसापूर्वी कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची पिशवी सुरत ते भिवंडी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चोरीला गेली होती. अहमदाबाद येथून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर दरम्यानच्या काळात महिला प्रवासी झोपी गेली. या संधीचा गैरफायदा घेत सुभानने पाळत ठेऊन महिला प्रवाशा जवळील सोन्याचा ऐवज असलेली पिशवी मध्यरात्री दोन ते चार वाजताच्या दरम्यान लांबवली.
पहाटे जाग आल्यावर या महिलेला आपली सोन्याचा ऐवज असलेली पिशवी गहाळ झाल्याचे लक्षात आले. या महिलेने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मध्य परिमंडळाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, हवालदार राजेंद्र दिवटे, जनार्दन पुळेकर, रणजित रासकर, रविंद्र दरेकर, स्मिता वसावे, वैभव जाधव, महेंद्र कार्डिले, रविंद्र ठाकूर, अजित माने, अजीम इनामदार, सोनाली पाटील, स्नेहल गडगे, अक्षय चव्हाण, सुनील मागाडे, गोरख सुरवसे यांच्या पथकाने तपास सुरू केला. सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना पथकाला वसई रोड स्थानकाबाहेर महिलेची पिशवी घेऊन एक इसम बाहेर पडत असल्याचे दिसले. तो इसम भायखळा भागात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला या भागातून सापळा लावून अटक केली. त्याची चौकशी केल्यावर त्याने अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये एका महिलेची सोन्याची दागिने असलेली पिशवी चोरल्याची कबुली दिली. याशिवाय कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये तीन मोबाईल चोरीचे गुन्हे केले आहेत, याची कबुली दिली.
हेही वाचा- ठाकुर्लीतील कचोरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी
सुभानवर भरुच, पुणे, भुसावळ, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून इतर अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यता, वरिष्ठ निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी व्यक्त केली.